जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे २ दिवसांपासून बेपत्ता आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. यासंदर्भाने त्यांच्या पत्नीने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे २ दिवसांपासून जालन्यात तळ ठोकून आहेत. त्यांनी यासंदर्भाने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे बुधवारी (२ फेब्रुवारी) रात्री ७ नंतर शहरातील यशवंतनगर भागातील राहत्या घरातून मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडले. घराबाहेर जाताना त्यांनी कोणतेही वाहन, मोबाईल फोन आणि खिशातील बटवाही नेलेला नाही. २ दिवसांपासून ताटे यांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. ताटे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून ते बेपत्ता असल्याची नोंद कदीम जालना पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
“पोलिसांकडून विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासणी”
या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले, “ताटे हे बेपत्ता असल्याच्या तक्रारीनंतर आपण स्वत: जालना येथे जाऊन माहिती घेतलेली आहे. पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासले आहेत. मात्र, यामध्ये ताटे यांनी काही साहित्य सोबत घेतले असल्याची माहिती पुढे येत आहे. ते कुठल्या कारणाने बेपत्ता झाले आहेत, हे आत्ताच सांगता येत नसले तरी आमची यंत्रणा विविध पदरांचा अभ्यास करत आहे.”
हेही वाचा : पुंछमध्ये सलग ६ व्या दिवशी चकमक सुरूच, जखमी अधिकारी आणि जवान बेपत्ता झाल्यानं खळबळ, नेमकं काय घडलं?
दरम्यान, घरातून बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक काही वाद आहे का? या प्रश्नावर डॉ. खाडे यांनी यावर आत्ताच काहीच सांगता येत नसल्याचे सांगितले. मात्र, ताटे यांच्या शोधासाठी सर्व टीम काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.