जालना : प्रतिष्ठेची ठरलेली जालना तालुक्यातील पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक रविवारी तणावपूर्ण वातावरणात आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडली. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल यांचे गट या निवडणुकीत समोरासमोर उभे होते. तेरा सदस्यांच्या जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत आमदार गोरंट्याल स्वत: उभे होते. परंतु त्यांचा पराभव झाला. अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर मात्र, विजयी झाले.
हेही वाचा >> “…तर कार्यक्रमाची सुरुवात अनिल देसाईंऐवजी एकनाथ शिंदेंनी केली असती”; वर्धापनदिनी नितेश राणेंची शिवेसेनेवर टीका
पानशेंद्रा संस्थेची निवडणूक चुरशीची होणार असल्याने शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार समोरासमोर अ्सल्याने सकाळपासून पानशेंद्रा गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मतदान प्रक्रिया सुरू असताना दोन्ही गटांत वादावादी झाल्यावर पोलीस बंदोबस्तात अधिक वाढ करण्यात आली. निवडणुकीत तेराही जागांवर खोतकर समर्थक उमेदवार विजयी झाले.
हेही वाचा >> “मी जर चिंता करत बसलो तर…”, उद्धव ठाकरेंचा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना संदेश!
विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्गातून काँग्रेसचे आमदार गोरंट्याल यांनी निवडणूक लढवली. परंतु त्यांचा खोतकर गटाचे उमेदवार प्रभागर विटेकर यांनी पराभव केला. विटेकर यांनी १३२ तर गोरंट्याल यांना १११ मते पडली. नऊ मते बाद झाली. या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर १४२ म्हणजे उमेदवारांत सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले.
भाऊसाहेब शंकरराव कवडे, विठ्ठल दादाराव पाचारणे, शालीक नारायण पाचारणे, श्रीमंत रंगनाथ पाचारणे, जनाबाई किसन शिंदे, निवृत्ती दत्तु साबळे, शिवाजी सीताराम साबळे, सविता ज्ञानदेव उगले, कौसल्याबाई काळे, कौसल्याबाई उत्तमराव गाडेकर, रुख्मण पाचारणे हे शिवसेना समर्थक उमेदवार विजयी झाले. निवडणुकीनंतर शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारांच्या समर्थकांमध्ये वादविवाद आमि बाचाबाची झाल्याचे प्रकार घडले. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.