Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा या गावात २६ फेब्रुवारी रोजी म्हणजेच महाशिवरात्रीच्या रात्री एक संतापजनक घटना घडली आहे. येथील महादेव मंदिराजवळ एका तरुणाला गावातील काही समाजकंटकांनी जुन्या वादातून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या गुंडांनी लोखंडी रोड गरम करून त्या रॉडचे चटके देऊन त्या तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेल्या अमानुष मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड याला पारध पोलीस ठाणे आणि एलसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडलं आहे. पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोदा या गावातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामध्ये आणवा येथील शेतकरी कैलास गोविंदा बोराडे हा महादेवाच्या दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी आरोपी सोनू दौड याने कैलासबरोबरचा जुना वाद उकरून काढला. त्यातून दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर मारहाणीत झालं. त्यानंतर सोनूचा भाऊ शिवसेना उबाठा गटाचा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाप्रमुख नवनाथ सुदाम दौड यांच्या सांगण्यावरून सोनूने कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर हा रॉड जळत्या चुलीमध्ये तापवून कैलासला चटके दिले. त्याच्या संपूर्ण शरीरावर निर्दयीपणे चटके दिले. यामुळे कैलास गंभीररित्या जखमी झाला.

कैलासला निर्दयीपणे मारहाण होत असताना गावकऱ्यांची केवळ बघ्याची भूमिका

कैलासला मारहाण होत असताना, त्याला चटके दिले जात असताना तिथे उपस्थित असलेल्या जमावाने, गावकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. उलटपक्षी बघ्याची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकाराचे फोटो व व्हिडिओ काढले. कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार चालू आहेत. या संदर्भात कैलास बोराडे याच्या फिर्यादीवरून नवनाथ सुदाम दौड आणि सोनू उर्फ भागवत सूदाम दौड (दोघेही रा. जानेफळ गायकवाड) या दोन्ही भावांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून दोघे भाऊ फरार होते.

एक आरोपी गजाआड, एक अद्याप फरार

गेल्या तीन दिवसांपासून पारध पोलीस आरोपींचा शोध घेत होते. पारथ ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक व विशेष गुन्हे अन्वेषण विभागाचं एक पथक दोन्ही आरोपींचा शोध घेत होतं. अखेर काल (१ मार्च) रात्री १० वाजण्याच्या सुमारास आणवा परिसरातील कोदा शिवरातून पोलिसांनी सोनूच्या मुसक्या आवळल्या. त्याला आज भोकरदन न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नवनाथ दौड हा आद्यापही फरार असून त्याला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक रवाना झालं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे.