लक्ष्मण राऊत

जालना : बियाणांच्या क्षेत्रात महिकोमुळे जालन्याचे नाव राज्यभर झाले. अनेक कंपन्या या भागात सुरू झाल्या. ही उलाढाल कोटय़वधींची. तर मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात या राज्यांत लोखंडी सळयांचा व्यापार जालना शहरातून होतो. मुळातच व्यापारी वृत्ती हे जालना जिल्ह्याचे वैशिष्टय़. हा चांगला गुण हेरून रेशीम शेती आणि आता थेट जवाहरलाल नेहरू पोर्टशी जोडणारी शुष्क बंदराची सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने जालना वाढते आहे. ऊस, कापूस या दोन्ही पिकांबरोबरच कृषी उद्योगातील शुद्ध बियाणांची पारख करणारे गाव अशी जालन्याची ओळख. पण करोनानंतर शिक्षणात काहीसे मागे पडलेल्या जिल्ह्याची प्रगती काहीशी घसरल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यात २० बियाणे कंपन्या आहेत. त्याची उलाढाल कोटय़वधींची आहे, तर लोखंडी सळया बनविण्याचा उद्योगही आता बहरला आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे. समृद्धीला जोडणारा हा जिल्हा आता पायाभूत क्षेत्रात प्रगती करत आहे. २५० कोटी रुपये केंद्रीय वस्तू व सेवा कर भरणारा, २३२ कोटींपेक्षा अधिक राज्य महसूल भरणारा आणि १०० कोटीपेक्षा अधिकची वीज वापरणारा हा जिल्हा आहे. दरवर्षी तीन दशलक्ष टन लोखंडी सळया करणाऱ्या प्रकल्पात २५ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध आहे. आता सोयाबीन, रेशीम या क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे. १९६४ पासून बद्रीनारायण बारवाले यांनी संकरित बियाणांच्या क्षेत्रात ज्या पद्धतीने पाऊल टाकले ते प्रगतीकडे नेणारे होते. उद्योग आणि पायाभूत क्षेत्रात आजही वाटचाल सुरू आहे. पण मानव विकासाच्या शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात विशेषत: प्राथमिक शिक्षण आणि कुपोषण हे निकष जिल्ह्याची अधोगती दर्शविणारे आहेत. त्यामुळे २००२ मध्ये राज्य शासनाने स्वीकारलेल्या मानव विकास अहवालात मानव विकास निर्देशांकात जालना जिल्हा मराठवाडय़ात सर्वात पिछाडीवर होता. त्या वेळी जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक ०.२७ म्हणजे अल्प होता. २०१२ च्या आकडेवारीनुसार हा निर्देशांक ०.६६ झाला. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा, मुलींमधील रक्ताच्या हिमोग्लोबिनचे प्रमाण, मध्यान्ह भोजनातील अनेक प्रकारच्या त्रुटी यामुळे मुलांकडे दुर्लक्ष आणि पायाभूत विकासात पुढे असे विरोधाभासी विकासचित्र जालना जिल्ह्यात दिसून येत आहे.

आरोग्य सुविधांची स्थिती

डिसेंबर २०२२ मध्ये राज्यातील एकूण शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या एक हजार ९०६ होती. त्यापैकी ४४ जालना जिल्ह्यात आहेत. राज्यातील ९५ उपजिल्हा रुग्णालयांपैकी एक जालना जिल्ह्यात आहे. राज्यात आठ सर्वोपचार रुग्णालये असून त्यापैकी एकही जालना जिल्ह्यात नाही. राज्यातील ३६४ ग्रामीण रुग्णालयांपैकी नऊ जालना जिल्ह्यात आहेत, तर २० स्त्री व बाल रुग्णालयांपैकी एक जालना जिल्ह्यात आहे.

शिक्षणातील गळतीची चिंता

जिल्ह्यात एक हजार ५८९ प्राथमिक शाळा असून शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण मोठे आहे. दोन वर्षांपूर्वी जालना एज्युकेशन फाउंडेशन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात तिसऱ्या ते पाचव्या इयत्तेतील तीनपैकी दोन विद्यार्थ्यांना प्राथमिक गणितातील पायाभूत ज्ञान नसल्याचे आढळून आले होते. तर तीनपैकी निम्मे विद्यार्थी मराठी भाषेतील साधा परिच्छेदही वाचू शकत नव्हते.

१३.७२ टक्केच सिंचनक्षेत्र

शेती हेच जिल्ह्यचे उपजीविकेचे प्रमुख साधन असले तरी जिल्ह्यातील सिंचनाखालील प्रमाण लागवडीयोग्य क्षेत्राशी १३.७२ टक्के असल्याची २०२०-२२ दरम्यानची शासकीय आकडेवारी आहे. कापूस, सोयाबीन ही प्रमुख पिके असली तरी जायकवाडी लाभक्षेत्रातील अंबड, घनसावंगी तसेच परतूर तालुक्यांत मागील पाच-सहा वर्षांत उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे.

कृषीमालाची बाजारपेठ

गळीत, द्विदल, तृणधान्यांसह मोसंबी आणि अलीकडेच रेशीम कोष खरेदी-विक्रीसाठी जालना बाजारपेठेचे नाव राज्यात अधोरेखित झालेले आहे. कापड, तयार वस्त्रप्रावरणे, कटलरी यांसह अनेक व्यापारांसाठी जालना शहर राज्यात प्रसिद्ध आहे. रेशीम शेतीमुळे आता कर्नाटकातील रामनगरऐवजी रेशीम कोष आणि धागा याचे व्यापार केंद्र म्हणून जालना प्रगती करत आहे.