वाई : जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ साताऱ्यासह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सातारा शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्यवकांनी सकाळी पोवईनाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत जोरदार घोषणाबाजी केली. युवकांनी शहरातून दुचाकी रॅली काढून घोषणाबाजी करत लाठीचार्जचा निषेध केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करत पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शरद काटकर, हरिष पाटणे, जयेंद्रदादा चव्हाण, अविनाश कदम, जीवन चव्हाण, भागवत कदम, अमोल मोहिते, संग्राम बर्गे, किशोर शिंदे, ॲड. अंकुशराव जाधव, ॲड. प्रशांत नलवडे, संदीप पोळ, वैभव शिंदे, बापूसाहेब क्षीरसागर, प्रशांत निंबाळकर, ॲड. उदय शिर्के, उमेश शिर्के तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा – सट्टेबाजीत हरलेले सहा लाख परत देण्यासाठी गॅरेजचालकाचे अपहरण, सट्टेबाजांना सोलापूरमधून अटक

सातारा शहरासह तालुका, कोरेगाव लोणंद, खंडाळा, शिरवळ, फलटण, मेढा, म्हसवड आदी ठिकाणी जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सातारा शहरातील सर्व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. पुणे बंगळूर महामार्गावरही वाहतूक संथ होती. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख हे स्वतः बंदोबस्ताची पाहणी करत होते. पोवईनाक्यावर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी संवाद साधला.

हेही वाचा – “आता निवेदन द्यायचे नाही, तर मशिदीचे अतिक्रमण आतमध्ये घुसून पाडायचे”, नितेश राणे यांचे विधान

बंदमुळे सातारा मध्यवर्ती, राजवाडा बसस्थानक ओस पडले होते. प्रवाशांची तुरळक वर्दळ होती. शहरातील राजवाडा, राजपथ, मोती चौक, पोवईनाका, राधिका रस्ता, मार्केटयार्ड आणि बाजार पेठेसह दुकाने बंद असल्याने शुकशुकाट होता. कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने रस्त्यावर पोलीस अधिकारी व कर्मचारीच दिसून येत होते. आज सोमवारी बंदचे आवाहन केले असले तरी, वाईचा आठवडे बाजार सोमवारऐवजी मंगळवार (दि. ५) बंद ठेवण्यात येणार आहे.