जालना / बुलढाणा : Jalna Lathi Charge in Maratha Reservation Protest जालन्यातील मराठा आरक्षण आंदोलकांवरील पोलीस लाठीमारप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश गृह खात्याने रविवारी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलडाण्यातील घोषणेनंतर गृहखात्याने त्वरित ही कारवाई केली. गरज भासल्यास पोलीस लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक यांनाही जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी बुलडाण्यात ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात सांगितले.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चेसाठी आमंत्रित केले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जरांगे-पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन समन्वयासाठी जालन्याला आले होते. जालन्यातील पोलीस लाठीमाराची घटना दुर्दैवी आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. गरज भासल्यास न्यायालयीन चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे असेल. आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. दरम्यान, लाठीमार प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या जागी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बलकवडे यांनी रविवारी पदभार स्वीकारला. जालन्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद रविवारीही राज्यभरात उमटले. मुंबईसह, नाशिक, मराठवाडय़ासह अनेक भागांत आंदोलने करण्यात आली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची आणि पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
मराठवाडय़ात काही ठिकाणी हिंसक आंदोलने करण्यात आली. हिंगोली येथे शासकीय गोदामास आग लावण्यात आली, तर बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील गुळज येथे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन इतर मागास प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी करत आंदोलक गोदावरी नदीपात्रात उतरले. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार वेळकाढूपणा करीत असल्याने आणि राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात येत नसल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी राज्य सरकार आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे म्हटले असून विविध पर्यायांवर चर्चा करण्यासाठी आंदोलकांना आमंत्रित केले आहे. छत्रपती उदयनराजे यांनीही शिंदे यांना चर्चेबाबत निवेदन दिले होते.
फडणवीस यांची जरांगेंशी चर्चा
आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर फडणवीस यांचा निरोप घेऊन गिरीश महाजन यांनी आंदोलकांची भेट घेतली. चुकीचे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले.
लाठीमार टाळायला हवा होता : मुख्यमंत्री
पोलिसांनी लाठीमार टाळायला हवा होता. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सरकार कधीच अशा लाठीमाराचे समर्थन करीत नाही. जे गुन्हे चुकीच्या पद्धतीने दाखल केले असतील, ते मागे घेतले जातील, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी
जालना लाठीमाराची अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्यामार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. तसेच जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचनाही दिल्या.
पडसाद..
- पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, त्यांच्या जागी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती.
- मराठा संघटनांच्या वतीने नाशिक जिल्ह्यात बंद, शहरात अनेक ठिकाणी आणि ग्रामीण भागांतही मोर्चे.
- हिंगोली : सेनगाव येथे शासकीय गोदाम जाळले, शासकीय वाहनाचीही जाळपोळ.