Jalna Lathi Charge in Maratha Reservation Protest : जालना या ठिकाणी मराठा मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेचे तीव्र पडसाद छत्रपती संभाजी नगर आणि जालना या ठिकाणी उमटले. तसंच शरद पवार यांनीही या ठिकाणी आज भेट दिली. त्यावेळी त्यांनी असा आरोप केला आहे की एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

“एकनाथ शिंदे सरकारने शब्द पाळला नाही त्यामुळे आंदोलन सुरु झालं. मात्र आंदोलन बळाचा वापर करुन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन आंदोलकांना हुसकावून लावलं. मोठ्या संख्येने पोलीस आंदोलनस्थळी आले. एका बाजूने चर्चा सुरु ठेवली तर दुसऱ्या बाजूने लाठीहल्ला केला. आंदोलकांना माझा सल्ला आहे की त्यांनी शांततेत आंदोलन सुरु ठेवावं कारण हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी आज जालना या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी ज्या अंतरवरली सराटी गावात आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्या गावालाही भेट दिली. तसंच मनोज जरांगे पाटील यांनाही ते भेटले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला नाही असा आरोप केला आहे.

नेमकी काय घडली घटना?

जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. मराठा आंदोलकांचं हे म्हणणं आहे की पोलिसांनी शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं हे आहे की आधी दगडफेक सुरु झाली त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बसची जाळपोळही करण्यात आली. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalna lathi charge eknath shinde didnt keep his word about maratha reservation said sharad pawar scj