नांदेड : आता भाजपात असलेले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कल्पनेतून आकारास आलेल्या तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाच्या मावेजाच्या विषयात असंख्य तक्रारी प्रलंबित असताना हा महामार्ग रद्दच होईल, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नांदेडमध्ये त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळासमोर केला.
नागपूर ते मुंंबई समृद्धी महामार्गाला नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांसह हिंगोलीचा काही भाग जोडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणार्या अशोक चव्हाण यांनी रस्ते विकास महामंडळातील आपल्या मर्जीतील तत्कालीन अधिकार्यांकडून वरील द्रुतगती मार्गाची आखणी केली होती. त्यानंतर मागील ५ वर्षांत या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया केली जात असताना शेत जमिनीच्या मावेजासंदर्भात नांदेड-परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांचा संघर्ष जारी आहे.
मागील काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संबंधित यंत्रणांकडे शेतकरी प्रतिनिधींनी वेळोवेळी आपली कैफियत मांडली, तरी शासनाकडून त्यांचे समाधान केले गेले नाही. अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी दुपारी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी आले असता वरील महामार्गात ज्यांच्या शेतजमिनी बाधित होणार आहेत, अशा शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आपले गार्हाणे पवार यांच्यासमोर मांडले. पण मूळ प्रश्नाचे समाधान करण्याऐवजी त्यांनी वरील महामार्गासाठी शासनाकडे पैसा नाही, आम्ही ते काम थांबवलेले आहे. गरज पडल्यास रस्ताही रद्द करू, असे सांगितल्याचा दावा कृति समितीचे समन्वयक दासराव हंबर्डे यांनी केला.
समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी वरील नवा द्रुतगती महामार्ग करण्यात यावा, अशी मागणी दोन्ही जिल्ह्यांतून कोणीही केली नव्हती, असे हंबर्डे यांनी अजित पवार यांच्याकडे स्पष्ट केले. योग्य मावेजा द्या, अन्यथा रस्त्याचे काम थांबवा, अशी मागणीही त्यांनी केली. वरील भेटीदरम्यान पवार आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली; पण या प्रकरणात लक्ष घालतो, असे पवार यांनी शेवटी सांगितले.
परस्परविरोधी वक्तव्य
नांदेडमध्ये माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी शासन मराठवाड्यासाठी काय करत आहे, याची माहिती देताना त्यांनी वरील द्रुतगती महामार्गाचा उल्लेख भाषणामध्ये केला होता. पण वरील शिष्टमंडळाशी बोलताना त्यांनी वेगळीच माहिती दिल्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. हा संभ्रम दूर करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.