ट्रकमधून वाहतूक केल्या जाणाऱ्या नर्सरीच्या झाडा आडून गांजाची तस्करी होत असल्याचा प्रकार जालन्यात समोर आलाय. आंध्र प्रदेशमधून गांजा घेऊन येणारा ट्रक आज (२४ डिसेंबर) सकाळी परभणी-मंठा रोडवरील कर्णावळ फाट्याजवळ मंठा पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये समोर आणि मागील बाजूस नर्सरीतील विविध झाडाची रोपे रचून ठेवण्यात आली होती. या ट्रकची पोलिसांनी झडती घेतली असता नर्सरीतील रोपाखाली गांजाची १२ पोती आढळून आली.

जप्त करण्यात आलेला गांजा तीन क्विंटल असून त्याची अंदाजे किंमत १८ लाख रुपये असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी या गांजासह २० लाखाचा ट्रक आणि ६ लाखाची नर्सरीची रोपे जप्त केलीय. याप्रकरणी भोकरदन तालुक्यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

गुप्त माहितीच्या आधारे पोलीस कारवाई

मंठा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख म्हणाले, “आज सकाळी साडेनऊ वाजता आम्हाला जिंतूर रोडकडून एक संशयास्पद ट्रक येत असल्याची आणि त्यात काही संशयास्पद वस्तू लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर आम्ही प्रतिष्ठित पंच, कॅमेरामन आणि पोलीस पथकासह कर्णावळ फाट्याजवळ कारवाई केली. यावेळी तेथील इंडियन हॉटेल समोर एक ट्रक उभा होता. तेथे ट्रकचालकाच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यावरून आम्ही ट्रकची झडती घेतली.”

“१२ गोण्यांमध्ये गांजाची १४८ पाकिटं”

“हा एमच एच २१ बीएच १७५८ या क्रमांकाचा ट्रक होता. या ट्रकमध्ये मागच्या बाजूला जवळपास ८०० नर्सरीची झाडं होती. त्या झाडांच्या पाठीमागे १२ गोण्यांमध्ये गांजाची १४८ पाकिटं आढळली. आम्ही १८ लाख ४३ हजार ६८० रुपयांचा गांजा जप्त केला. या गांजाचं वजन ३ क्विंटल ७ किलो २८० ग्रॅम आहे. हा गांजा आंध्र प्रदेशमधून येत होता आणि बदलापूरच्या दिशेने जात होता. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय,” अशी माहिती देशमुख यांनी दिली.

हेही वाचा : सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, कर्नाटकातून शहरात आलेला सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त

आम्ही २० लाख रुपयांचा ट्रक जप्त केला आहे. आरोपी ६ लाख रुपयांच्या झाडांच्या आड तस्करी करत होता. त्यामुळे ती सर्व झाडं देखील जप्त करण्यात आली आहे. गोविंद हिरालाल चांदा (४२ वर्षे) बादर हिरालाल चांदा (३५ वर्षे) दोघेही राहणार कल्याणी (तालुका – भोकरदन) यांना ताब्यात घेण्यात आलंय. यात आणखी आरोपी निष्पन्न होऊ शकतात. त्यांचा तपास घेतला जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, एसडीपीओ राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.

Story img Loader