जालना : जिल्ह्यातील बदनापूर शहरात शुक्रवारी दहावीच्या परीक्षेदरम्यान एका केंद्रावरून मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा पसरली. या प्रकाराचे काही वाहिन्यांनी वार्तांकन केले. मात्र, जालन्याचे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेपर फुटल्याच्या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करून नेमका काय प्रकार होता, याची माहिती माध्यमांना दिली. तर छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनी याप्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जालना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. तसेच या प्रकाराबाबत कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर मंडळाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डाॅ. पांचाळ म्हणाले, समाजमाध्यमात पसरवण्यात आलेली प्रश्नपत्रिका ही पेपरचा भागच नाही. जे प्रश्न त्यामध्ये दिसतात ते कुठल्यातरी गाईडचे आहेत. पेपर फुटीची घटना घडली नाही. एका पालकाने केंद्रावर दगडफेक केली. त्यासंदर्भाने कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर परीक्षा काॅपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे.