जालना : जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या अंबड येथील आगाराची सिल्लोडला जाणारी बस फलाट क्रमांक १ वर थांबवत असताना ती फलाट क्रमांक ३ व ४ वर शिरली. बस चालकाकडून ब्रेक लागला नसल्याने नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून, शुक्रवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये दोन ठार तर पाच प्रवासी जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खलीलउल्ला अजीमुल्लाह शेख (रा.जुना जालना), मुरलीधर आनंदराव काळे (५० रा.शेवगा) या दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमींपैकी २ दोघांना अंबड ग्रामीण रुग्णालय व इतरांना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आगार प्रमुख रणवीर कोळपे यांनी दिली.अंबड आगारातून सिल्लोडला जाण्यासाठी निघणाऱ्या बसचे (क्र. एम. एच.२० – बी. एल. १६०६) चालक व्ही. एस. राठोड (३६) हे बसला दुपारी फलाट क्रमांक १ वर लावत असतांना त्यांना ब्रेक लागले नाही. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस सरळ फलाट क्रमांक ३ व ४ वर शिरली. यावेळी बस स्थानकात मोठी गर्दीही होती.

या घटनेत अनिता बंडू गुंजाळ (३०, रा. अंबड), पार्वती धोंडीराम नवघरे (३०, रा. जामदाये ता.हिंगोली), पूजा कडुबा धोत्रे (४), हिना अलीम शेख (३०), रेहाना शेख अलीम (१, दोघेही रा.धाकलगाव ता. अंबड) अशी जखमींची नावे आहेत.

अपघातग्रस्त बसची तपासणी

अपघातग्रस्त बसची तपासणी जालना येथील यंत्र अभियंता यांच्याकडून करण्यात आली. तपासणीनंतर बसमध्ये कसलाही यांत्रिक बिघाड झाला नसल्याचे सांगण्यात आले. अपघातातील जखमींना तातडीने रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले आहे. महामंडळाच्या नियमानुसार वैद्यकीय मदत पुरविल्या जाईल. अपघाताची चौकशी सुरु आहे. – रणवीर कोळपे, आगारप्रमुख, अंबड