अहिल्यानगरः शिक्षकच नाही तर शिकायचे कसे, असा प्रश्न पडलेल्या मोहा (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आज, सोमवारी जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयातच शाळा भरली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे राज्यप्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी सांगितले की, मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरवले जातात. एकूण पाच शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र सध्या या ठिकाणी पहिली ते आठवीच्या वर्गासाठी केवळ तीन शिक्षक उपलब्ध आहेत. यामुळे मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. या ठिकाणी निवारा बालगृहातील अनाथ, निराधार व वंचित घटकातील मुले शिक्षण घेतात.
पुरेसे शिक्षक नसल्याने मुलांची प्रगती घटन्याचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात ७ दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे वंचित बहुजन बहुजन आघाडीने आज सकाळीच निषेध आंदोलन केले. जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीने शाळेतील विद्यार्थ्यांना नेले व तिथे जाऊन शाळा भरवली. घंटा वाजविण्यात आली. विद्यार्थी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या दारातच बसले होते. जोपर्यंत शाळेला शिक्षक उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही व रोज या ठिकाणी शाळा भरवली जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला.
बदली प्रक्रियेमध्ये किंवा शिक्षक पदस्थापनेमध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे मोहा जिल्हा परिषद शाळेत प्रथम भरवण्यात येईल, असे लेखी आश्वासन जामखेडचे गट शिक्षणाधिकारी विजय शेवाळे यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांसमवेत सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उमा जाधव, बापू ओहोळ, सचिन भिंगारदिवे, राजू शिंदे, ऋषी गायकवाड, वैजनाथ केसकर, संतोष चव्हाण, तुकाराम शिंदे, विशाल पवार, उर्मिला कवडे, भीमराव सुरवसे, सर्जेराव गंगावणे, मच्छिंद्र जाधव, कृष्णा जाधव, रजनी बागवान, संगीता केसकर, राहुल पवार, सरपंच भीमराव कापसे आदी आंदोलनात सहभागी होते.