कर्जत:  ३९९ कोटी रुपयांचे रस्त्याचे काम तीन वर्षांपासून रखडले. ठेकेदारावर कारवाईची नागरिकांची मागणी आढळगाव हा जामखेड हा रस्ता अतिशय वाहतुकीचा व अनेक तालुक्यांना जोडणारा असा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. या रस्त्यासाठी ३९९.३३ कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये या रस्त्याला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठेकेदाराने मुदत संपल्यानंतर मुदतवाढ देखील घेऊन ती देखील मुदत संपली या मुदतीत काम पूर्ण झाले नाही म्हणून  पुन्हा सरकारकडे मुदत वाढीसाठी मागणी केलेली आहे. निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीने हा रस्ता करण्यासाठी निविदा घेतलेली असून आता या कंपनीला काम पूर्ण करता आले नाही म्हणून दंड ठोठावून काळ्या यादीमध्ये टाकून द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

नव्हरा, इनामगाव काष्टी श्रीगोंदा जळगाव जामखेड असा हा राज्यमार्ग असून याला  ५४८ बी या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. आणि या महामार्गावरील आढळगाव ते जामखेड या अवघ्या ६२.७७ कि मी. या अंतरामध्ये दोन लेन मध्ये चौपदरीकरण करणे यासाठी एवढा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जवळपास चारशे कोटी रुपये निविदा सन २०२० मध्ये मंजूर झाली. निखिल कन्स्ट्रक्शन यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. त्यांना 18 महिन्याची मुदत काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आली होती. ही मुदत ऑगस्ट २०२३ मध्ये संपली. या कालावधीमध्ये फारसे काम निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीने केले नाही. वनविभाग यास इतर अडचणी व कोरोना काळ दाखवत कंपनीने सरकारकडून या कामासाठी कुठलाही दंड न भरता मुदतवाढ मिळवली . मुदतवाढ २०२४ पर्यंतच काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली होती मात्र आता ती मुदत देखील पूर्ण झाली असून या कालावधीमध्ये देखील संबंधित कंपनीला हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही. हा रस्ता पूर्ण करावा यासाठी श्रीगोंदा तालुक्यात कर्जत तालुक्यात व जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने झाली. आजही अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे अनेक अधिकारी यांचे दुर्लक्ष

निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या कामाबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी असताना देखील राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कायमच या कंपनीच्या कामाकडे व त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले. असे करण्यामागे या अधिकाऱ्यांचा नेमका हेतू काय होता हे मात्र समजले नाही. हाताची घडी व तोंडावर बोट ठेवत या अधिकाऱ्यांनी तीन वर्षे झाले तरी एवढ्या कमी अंतरावरील काम या ठेकेदाराने पूर्ण केले नाही याबद्दल याला कधीही जाब विचारला नाही किंवा तरतूद असताना देखील या कंपनीवर दंडाची कोणतीही आकारणी केलेली नाही. उलट या कंपनीला मुदतवाढ देण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अहिल्यानगर येथील कार्यालयातील अधिकारी हे सातत्याने अग्रेसर असल्याची दिसून आले. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अनेक वेळा निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे काम करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत होता. यामध्ये अनेक वेळा आर्थिक बाबींचा देखील आरोप झालेला आहे. आज या रस्त्याच्या कामाबाबत विचारणा केली असता अनेक अधिकारी अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह

निखिल कन्स्ट्रक्शन या रस्त्याचे काम करताना त्याचा दर्जा देखील अतिशय सुमार असल्याची ठिकठिकाणी दिसून येते. अनेक ठिकाणी सिमेंट काम पूर्ण होण्याच्या आधीच निघून गेले आहे. ज्या ठिकाणी पूल आहे त्या ठिकाणी जोड दिलेला नाही. काही ठिकाणी रस्ता खराबही झालेला आहे. यामुळे या कंपनीच्या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणि अशी सर्व परिस्थिती असताना देखील या कंपनीने पुन्हा एकदा या रस्त्याच्या कामासाठी मुदत वाढ मागितली आहे. यामुळे आता या कंपनीला मुदत वाढ देऊ नये. व निवेदी मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कंपनीला आर्थिक दंड करण्यात यावा आणि काम करण्यासाठी पात्र नाही म्हणून या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची नागरिकांची मागणी आहे. यावर आता राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी काय निर्णय घेतात याकडे श्रीगोंदा कर्जत व जामखेड या तीन तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.