जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसच्या (आयईडी) स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद झाले आहेत. शशी नायर हे पुण्यातील खडकवासला येथे राहत होते.
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ पेरुन ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या दोन स्फोटांमध्ये सैन्यातील मेजर शशीधरन नायर हे शहीद झाले आहे. त्यांच्यासोबत एक जवानही शहीद झाला आहे. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठीच दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला.
शहीद झालेले मेजर शशीधरन नायर हे पुण्यातील रहिवासी होते. त्यांची पत्नी तृप्ती नायर या पुण्यातील खडकवासला येथे राहतात. मेजर शशीधरन हे ३३ वर्षांचे होते. ११ वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते. मेजर नायर यांचे पार्थिव सकाळी ११ वाजता विमानाने पुण्यात येणार असल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, राजौरी जिल्ह्य़ातील सुंदरबनी भागात नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक भारवाहक (पोर्टर) शहीद झाला.