साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्याकडून कारखाना बळकावल्याचा आरोप एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा लिलाव झाला तेव्हा घाडगे यांनी खरेदी केला होता. लिलाव प्रक्रियेला माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.”देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच,” असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती
“आमच्या कारखान्याचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला होता. केवळ तीन कोटींचा हफ्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या कारखान्याचं त्यांच्याकडे जे अकाऊंट आहे त्या खात्यात आठ कोटी ३४ लाख जमा होते. ते पैसे वळवण्यास सांगितलं असता दुर्लक्ष करण्यात आलं. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आलं असतं. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. विचारणारं कोणी नव्हतं. त्यांनी सत्तेचा पुरेपूर गैरफायदा केला आणि २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार अजित पवारांच्या काळात झाला,” असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
आता ईडी करून साखर कारखान्यांवर केली गेलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित – राजू शेट्टी
“थोडा उशीर झाला पण आता ईडीने कारवाई केली असून आम्हाला न्याय मिळाला आहे. वास्तविक २०१९ मध्ये अण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि मी अशा चार जणांनी अर्ज केला होता. अरोरा यांनी नंतर माघार घेतली. २०१९ मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी ईडीने एफआयआर दाखल करुन घेतला होता. पण काहीच कारवाई न झाल्याने दुसरा अर्ज करण्यात आला. त्याला ईडीने आम्हाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचार झाला असल्याचं त्यांनी मान्य केलं. २७ हजार सभासदांना न्याय मिळाला आहे,” अशी भावना शालिनीताई यांनी व्यक्त केली आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळाप्रकरणी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वार शुगर्स या कारखान्याच्या ६६ कोटींची जागा, इमारत आणि यंत्रसामग्री यावर जप्ती आणण्यात आल्याची माहिती ईडीच्या सूत्राकडून देण्यात आली. जरंडेश्वार सहकारी कारखाना २०१० मध्ये लिलावात काढण्यात आला होता. तेव्हा समर्पित किमतीपेक्षा कमी दराने हा कारखान्याचा लिलाव करण्यात आल्याचे ईडीला चौकशीत आढळले होते. यानुसारच ही कारवाई करण्यात आली.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने खरेदी के ला होता. या कंपनीने हा कारखाना लगेचच जरंडेश्वार शुगर्स या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला होता. या कं पनीत ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या कंपनीचा मोठा हिस्सा आहे. स्पार्क लिंग कंपनी ही अजित पवार व त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे. जरंडेश्वार कारखाना ताब्यात घेण्यासाठी गुरू कमो़डिंटी या बेनामी कंपनीचा वापर करण्यात आला होता. या कारखान्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ७०० कोटींचे कर्ज घेतल्याचेही ईडीला आढळून आले आहे.
राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील रकमेतून हा कारखाना अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने आपल्या ताब्यात घेतला होता. त्या विरोधात ईडीने कारवाई केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीने कमी दरात खरेदी केलेल्या सहकारी साखर कारखान्याची चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.