सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रश्नावर बार्शीचे भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना पुन्हा आव्हान देत, त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या बाजूने फायदा होण्यासाठी आंदोलनाची ढाल पुढे करीत असल्याचा आरोप केला आहे. जरांगे यांचा मराठा प्रश्नावर आंदोलनात प्रामाणिकपणा नसेल तर त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल, इशारा दिला आहे.
जरांगे यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांच्यासोबत सुरुवातीच्या चर्चेत राऊत सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांपूर्वी जरांगे यांच्यावर एका कार्यक्रमातून टीका केली होती. आज पुन्हा एकदा बार्शी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडत इशारा दिला आहे.
हेही वाचा – सांगलीत गणेशाचे थाटात आगमन; ध्वनिक्षेपकांच्या भिंती, ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुका
राऊत यांनी यावेळी आक्रमक शैलीत जरांगे यांच्यावर कडवी टीका केली. ते म्हणाले, की आमचे राऊत घराणे छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणारे आहे. यामुळे जर जरांगे हे खंडोजी खोपडेंच्या भूमिकेत महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी आंदोलनाच्या नावाखाली राजकारण करणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असे करून दाखवू, या मराठा छाव्याला तुम्ही डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. जरांगे यांनी प्रामाणिक भूमिकेतून बार्शीत येऊन मराठा आरक्षण प्रश्नावर सभा घ्यावी. त्यांचे आपण स्वागत करू, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
पवार, ठाकरे, पटोलेंकडून हमीपत्र आणावे
जरांगे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत राऊत म्हणाले, की मराठा आरक्षण प्रश्न खरोखर सोडवायचा असेल तर जरांगे यांनी अगोदर महाविकास आघाडीमधील शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्याकडून मराठा ओबीसी आरक्षणाची हमी देणारे पत्र लिहून आणावे. त्यांनी जर तसेच हमीपत्र आणून दाखवले तर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची लेखी हमीपत्रे घेऊन येऊ. जर महायुतीच्या या तिघा नेत्यांनी मराठा ओबीसी आरक्षणाच्या बाजूने हमीपत्रे दिली नाही तर आपण राजकीय संन्यास घेण्यास तयार आहोत. मनोज जरांगे-पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांची लेखी हमीपत्रे आणण्याची जबाबदारी घ्यावी, असे आव्हान राऊत यांनी दिले.
फडणवीस बोलावते धनी – जरांगे
दरम्यान आमदार राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेवर जरांगे यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले, की राऊत यांच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द देवेंद्र फडणवीस यांचा आहे, फडणवीस हेच त्यांचे बोलावते धनी आहेत, असा प्रत्यारोप केला. आपले आंदोलन कुणा राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या दावणीला बांधले गेलेले नसल्याचा खुलासाही जरांगे यांनी या वेळी केला.