धाराशिव : राज्यातील दोन मराठा मंत्र्यांना हाताशी धरून राज्य सरकारच आता आंदोलन करणार आहे. सलग बारा दिवस अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर त्याची दखल घेवून मुख्यमंत्री फडणवीस बैठक लावणार असल्याची माहिती आपल्याला त्याच मराठा समाजाच्या मंत्र्याने दिली असल्याचा गौप्यस्फोट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. वाह रे सरकारी आंदोलन अन वाह रे तुमचं बेगडी सरकार असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्यसरकारवर प्रखर शब्दात टीकाही केली.

धाराशिव येथे शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी चौखूर फटकेबाजी करीत राज्य सरकारला खडे बोल सुनावले. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला हे सरकार वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यातील माराठ समाजातील दोन मंत्र्यांना पुढे करून आंदोलन करण्याचा डाव सरकारने आखला आहे. मात्र त्यातील एका मंत्र्यानेच आपल्याला ही माहिती दिली आहे असे सांगत त्या मंत्र्याचं नाव तेवढं विचारू नका अन्यथा यापुढे आतील गोष्टी आपल्याला कुणीच सांगणार नाही असे म्हणत जरांगे यांनी संबंधित मंत्र्यांचे नाव उघड करणार नसल्याचे सांगितले. पण आपल्यासोबत आणि समाजासोबत गद्दारी केली तर वेळ आल्यावर त्याचे नाव नक्की जाहीर करिन आत्ता त्याचे नाव विचारू नका असेही जरांगे यावेळी म्हणाले.

राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी थेंब थेंब रक्त जाळत आहे. सगळ्यांना अपेक्षा आहे की आरक्षण मिळायला हवे. मात्र हे सरकार जाणूनबुजून आरक्षण देत नाही.शेतकरी आणि मराठा समाजाचा या सरकारला तिरस्कार आहे. तरीही येत्या मंगळवरपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतील याबाबत शंभर टक्के आशा आहे. कारण आमच्या आठपैकी चार मागण्या तातडीने मान्य करू, त्याची लागलीच अंमलबजावणी करू असे सांगितले होते. चार मागण्यांपैकी आम्ही दोन मागण्यांवर आलो. शिंदे समितीला मुदतवाढ दिली मात्र ती अजून काही पळत नाही. त्यासाठी मनुष्यबळ दिले नाही, निधीची तरतूदही नाही आणि अद्याप त्याचे कक्षही स्थापन केले नाहीत. कुणबी प्रमाणपत्र ऑफिसमध्ये पडून आहेत परंतु त्याचे वाटप नाही याचाच अर्थ असा की शिंदे समिती अद्याप काम करीत नाही. तसेच हैद्राबाद गॅझेट, सातारा आणि बॉम्बे गॅझेटही अद्याप लागू केलेले नाही. भ्रष्टाचार करायला, खून करणारांना पाठीशी घालायला सरकारला वेळ आहे मात्र आमच्या मागण्यांचे काय झाले हे सांगायला या सरकारला वेळ नसल्याची टीकाही जरांगे यांनी केली.

…तर समाजाने सुरेश धसांना डोक्यावर घेतलं असतं

जिथं जाण्याची गरजच नव्हती तिथं गेलातच कशाला? स्वतः गेलात आणि बदनामी, षडयंत्र असे बोलत सुटला आहात. तुम्हाला कुणी बळजबरीने नेले नव्हते तुम्ही स्वतः गेले होते. तुमच्यावर हे सगळं मिटवून घेण्यासाठी पक्षाचा एवढाच दबाव होता तर जाहीरपणे माझ्या मराठा समाजाला तसे सांगायला हवे होते. दबाव झुगारून समाजासाठी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. असे केले असते तर समाजाने तुम्हाला डोक्यावर उचलून घेतले असते असे म्हणत जरांगे पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर मंत्री धनंजय मुंडे यांच्या गुप्तभेटीवरून निशाणा साधला. आम्ही त्यांना खूप जीव लावला होता. त्यांच्या केसालाही धक्का लागला असता तर राज्यातील घराघरातून माराठ रस्त्यावर उतरला असता. त्यांनी समाजासोबत असे वागायला नको होते असेही जरांगे म्हणाले.

Story img Loader