सांगली : अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, थंडी अशा सततच्या बदलत्या हवामानामुळे यंदा मोगरा उत्पादनात मोठी घट झाल्याने ऐन लग्नसराईमध्ये मोगऱ्याचा दर तिपटीने वाढून किलोला ३ हजारांवर पोहचला आहे. यामुळे नववधूंची वेणी मोगऱ्याऐवजी मोगऱ्यासारख्या दिसणाऱ्या काकडा फुलांनीच सजवावी लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह अनेक शहरांतील फुलबाजारात सध्या या मोगऱ्याच्या वाढलेल्या दराची चर्चा आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरज दुय्यम बाजार आवारात दररोज पहाटेपासून फुलांचे सौदे होतात. पश्चिम महाराष्ट्रातील हा सर्वांत मोठा बाजार असल्याने या ठिकाणाहून सातारा, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, विजापूर, हैदराबाद या ठिकाणी फुले पाठविण्यात येतात.
लग्न सराईमध्ये सजावट, नववधूसह अन्य महिलावर्गाच्या वेणीसाठी मोगरा फुलांना मोठी मागणी असते. मोगऱ्याचे स्थानिक पातळीवर मोठे उत्पादन नसल्याने याची आवक प्रामुख्याने बंगळुरू येथून होत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. यंदा बदलत्या हवामानामुळे तेथील मोगरा उत्पादनास मोठा फटका बसला असल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे. आवक कमी आणि लग्नसराईमुळे मागणी जास्त यामुळे मोगऱ्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सामान्यपणे मोगऱ्याचा किलोचा दर ८०० ते ९०० रुपये असताना यंदाच्या हंगामात तो ३ हजार रुपये किलोवर पोहचल्याचे फुलांचे घाऊक व्यापारी रमेश कोरे यांनी सांगितले. यामुळे लग्नकार्यातील सजावट, नववधूच्या वेणीसाठी गंधहिन असलेल्या मात्र, मोगऱ्यासारख्या दिसणाऱ्या काकडा फुलांचा वापर होत आहे. याचे दर किलोला २५० रुपये असे मोगऱ्याच्या तुलनेत स्वस्त आहेत.
लग्नाचा हंगाम सुरू झाल्याने अन्य फुलांचे दरही तेजीत असून शेवंती २०० रुपये, झेंडू ६० ते ७० रुपये, निशिगंध १५० ते २०० रुपये, गलांडा ३० ते ४० रुपये प्रतिकिलो आहेत. पुष्पहारामध्ये गलांडा फुलाऐवजी शेवंती फुलांचा वापर वाढला असल्याने गलांडा फुलाला दर नसल्याचे कोरे म्हणाले. बदलत्या हवामानामुळे अनेक पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. आता यामध्ये फुल उत्पादनासही फटका बसू लागला आहे. बाजारात अचानक कमी होणारी आवक आणि वाढलेली मागणी यामुळे मोगऱ्याच्या दरात तिपटीने वाढ झाली आहे. – रमेश कोरे, फुलांचे घाऊक व्यापारी, सांगली</p>