अकोले : तालुक्यातील राजुरमध्ये काविळीची साथ पसरली असून, आठवडाभरात ९७ कावीळसदृश रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर साथ नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणाही सक्रिय झाली असून, सर्वेक्षणासाठी ३० आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. जनजागृती आणि उपाययोजनेनंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार दि. १७-१८ एप्रिलपासून राजुरमध्ये काविळीचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. मध्यंतरी काविळीचे १०-१२ रुग्ण रोज खासगी दवाखान्यात दाखल होत होते.

काविळीच्या वाढत्या रुग्णसंख्येची दखल घेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी राजूर येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली. या वेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नेहरकर, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्याधिकारी डॉ. श्याम शेटे आदी उपस्थित होते. आज, शनिवारी दिवसभरात ८ रुग्ण आढळल्याचे डॉ. शेटे यांनी सांगितले.

सीईओ येरेकर यांनी राजूरला पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली, तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिनय लहामटे यांच्याकडून उपचाराची माहिती घेत सूचना केल्या. आजपासून आरोग्य विभागाची पथके सलग तीन दिवस राजूर बरोबरच परिसरातील गावांनाही भेटी देत कुटुंबांचे सर्वेक्षण करणार असून, जनजागृती करणार असल्याचे डॉ. शेटे यांनी सांगितले. राजूरबरोबर परिसरातील गावांचे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश आरोग्य विभागास देण्यात आले आहेत. राजुरमधील वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. रुग्णालयातील कावीळ रुग्णांची संख्या रोज कळवण्याची, गंभीर रुग्णांना तातडीने उपचारासाठी पुढे पाठवावे, तसेच उपचारासंदर्भात सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा साथरोग अधिकारी नारायण वायफासे यांनीही भेट देत आवश्यक सूचना केल्या. आरोग्य विभाग रुग्णांवर उपचार, आरोग्य शिक्षण व पाणी गुणवत्तेचे उपाय राबवत आहे. मेडिक्लोर आणि जागृतीसाठी हस्तपत्रिका घरोघर वाटप होत आहे. गावकऱ्यांनी घाबरून न जाता पाणी उकळूनच वापरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पाणी टाकी स्वच्छतेचा आदेश

कावीळ आजार पाण्यामुळे होत असल्याने सीईओ येरेकर यांच्या पथकाने राजूरला पाणीपुरवठा होणाऱ्या टाकीची पाहणी केली. टाकीची अवस्था पाहून खडे बोल सुनावत तातडीने स्वच्छतेच्या सूचना दिल्या. यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा आणि टाकी स्वच्छ झाल्यानंतरच पाणीपुरवठा सुरू करावा, असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी करावयाच्या दुरुस्तीची कामे तत्काळ मार्गी लावण्याचा आदेश त्यांनी स्थानिक प्रशासनास दिला.

पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य

गावातील अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे काविळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. पाणी टाकीसफाई व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर, तसेच शुद्धीकरण तपासणीनंतर पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेटे यांनी सांगितले. यापूर्वी घेतलेल्या पाण्याचे सर्व नमुने पिण्यास अयोग्य आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे.