जायकवाडी जलाशयात वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याबाबत सोमवारी मंत्रालय पातळीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. जायकवाडीत वरच्या धरणातून २० टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी मराठवाडय़ातील जनता आणि लोकप्रतिनिधींकडून गेली काही दिवस करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वीच मराठवाडय़ातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी या संदर्भात जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली होती. वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची मराठवाडय़ातील जनतेची न्याय्य मागणी पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आक्रमकरीत्या व्यक्त  केली होती. विशेष म्हणजे जलसंपदा खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे सध्या २० टीएमसी पाणी सोडले नाही तर मराठवाडय़ातील जनतेच्या मनात पक्षाबद्दल नाराजी निर्माण होईल, अशी भीती त्यांनी या वेळी व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर जायकवाडीतून वरच्या धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय सोमवारी जाहीर होण्याची शक्यता असली तरी हे पाणी किती प्रमाणावर सोडले जाईल, याबद्दल साशंकता आहे. मराठवाडय़ातील जनतेची २० टीएमसी पाणी सोडण्याची मागणी असली तरी १० ते २० टीएमसी दरम्यान पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर होईल, असे सूत्रांकडून समजते.

Story img Loader