राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव प्रतिक पाटील आणि उद्योगपती राहूल किर्लोस्कर यांची कन्या अलिका यांचा शाही विवाह सोहळा रविवारी मोठ्या थाटा-माटात संपन्न झाला.या विवाहास राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांसह मतदार संघातील हजारो लोकांनी हजेरी लावली.
लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांचे नातू तथा आ. पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव प्रतिक राजारामनगरमध्ये भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली होती. वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी भव्य व्यासपीठही उभारण्यात आले होते. या व्यासपीठावर मंदिर, घंटा यासह फुलांची नेत्रदीपक आरास करण्यात आली होती.
वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील नेत्यांसह राज्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. महनीय व्यक्तींच्या आगमनामुळे इस्लामपूर शहरात अनेक रस्त्यावर वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी होउ नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, उदयनराजे, छत्रपती शाहू महाराज, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत, रामराजे निंबाळकर, बाळासाहेब पाटील, संजयकाका पाटील, आदीसह मंत्री शंभूराजे देसाई, सुरेश खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आ. पाटील स्वागत करीत असताना खा. पवार यांचे नाव घेत असताना भावूक झाले होते.