राज्य सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगली-इस्लामपूरमधील जनतेला सरकारी सूचनांचे पालन करुन काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी सर्वसामान्यांकडून आलेल्या काही प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. सांगलीमध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या सांगलीमध्ये करोनाची लागण झालेले २० पेक्षा जास्त रुग्ण आहेत.
त्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीने त्यांना सांगलीतच करोनाग्रस्त रुग्णांची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी केली. त्यावर जयंत पाटील यांनी “करोना व्हायरसची चाचणी करणाऱ्या लॅबला परवानगी देण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. आम्ही त्यांच्याकडे लॅबच्या मागणीसंदर्भात पाठपुरावा करत आहोत. सध्या मुंबईत करोना व्हायरसची चाचणी करणाऱ्या चारच लॅब आहेत. जास्त ठिकाणी लॅबला परवानगी दिल्यास त्यातूनही करोनाचा फैलाव आणखी वाढू शकतो असे केंद्राचे म्हणणे आहे” असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा- महाराष्ट्राची चिंता वाढली, करोनाग्रस्तांची संख्या १७७
दरम्यान एका व्यक्तीने एन-९५ मास्कच्या कमतरतेसंदर्भात प्रश्न विचारला. “एन-९५ मास्कची कमतरता आपल्याकडे आहे. पण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे युद्धपातळीवर हे मास्क उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे मास्क जसे उपलब्ध होतील, तसे गरजेनुसार ते त्या भागात पोहोचवण्यात येतील” असे जयंत पाटील म्हणाले.