राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर अजित पवार गटातील नेते प्रफुल पटेल यांनी २००४ मध्येच राष्ट्रवादीची भाजपा आणि शिवसेनेबरोबर युती होणार होती, असा गंभीर आरोप केला. तसेच प्रमोद महाजन यांना त्यांचं दिल्लीतील महत्त्व कमी होईल अस वाटल्यानं ही युती नको होती, असंही नमूद केलं. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. आता शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१ डिसेंबर) नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटील म्हणाले, “मी त्यावेळी लहान होतो. मला तपशील माहीत नाही.ते म्हणतात २००४ ला भाजपाबरोबर जाणार होते, पण तेव्हा ते गेले का? घटना काय घडली यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जर शरद पवारांना भाजपाबरोबर जायचं असतं, तर ते यापूर्वीच गेले असते. ते भाजपाबरोबर गेले नाहीत ही वस्तूस्थिती आहे. त्याचं दुःख कुणाला असेल, तर माझा त्याला नाईलाज आहे.

“चिंतन शिबिरात चिंतन करायचं असतं. चिंतनात ते काही बोलले असतील. मला तपशिलात ते काय बोलले माहिती नाही. त्याबाबत काही मत व्यक्त करायचं असेल, तर ते पूर्ण काय बोलले ते ऐकूनच मी बोलेन,” असंही जयंत पाटलांनी नमूद केलं.

प्रफुल पटेल नेमकं काय म्हणाले होते?

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आपली भाजपा आणि शिवसेनेबरोबर २००४ लाच युती होणार होती. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा जन्माला आला होता. त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांचा १६-१६-१६ असा फॉर्म्युलादेखील ठरला होता. भाजपा-शिवसेनेबरोबर युतीत लोकसभा निवडणूक लढायची आणि सरकारमध्ये सामील व्हायचं असं ठरलं होतं. यासाठी माझ्या दिल्लीतल्या घरात दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांची चर्चा झाली होती. ही चर्चा आपण कोणाच्या सांगण्यावरून केली माहितीय का? अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह या तिघांच्या सूचनेप्रमाणे बैठक झाली.”

हेही वाचा : “२०१४ मध्ये राष्ट्रवादीनं माझं सरकार पाडलं”, चव्हाणांच्या विधानाला प्रत्युत्तर देत प्रफुल्ल पटेल म्हणाले…

“माझ्या घरी झालेल्या बैठकीनंतर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे खुश होते. परंतु, त्यांना या सगळ्या घडामोडींमध्ये फारसं सहभागी करून घेतलं नव्हतं. दुसऱ्या बाजूला प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण त्यांना वाटत होतं की या युतीमुळे त्यांचं दिल्लीतलं महत्त्व कमी होईल. महाजन यांना वाटत होतं की, आज मी दिल्लीत महाराष्ट्रातला निर्विवादपणे मोठा नेता आहे. परंतु, शरद पवार आपल्याबरोबर आले तर आपले दिल्लीतले पक्षश्रेष्ठी पवारांचंच जास्त ऐकतील. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना बैठकीची बातमी सांगितली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर, शरद पवारांवर आडवी तिडवी टीका केली आणि २००४ ला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीची होणारी युती फिस्कटली. हे कोणालाही माहिती नसेल. हे मी आज पहिल्यांदाच जाहीरपणे सांगतोय,” असंही पटेल यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil answer allegations of praful patel on sharad pawar about 2004 politics pbs
Show comments