महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (२ जुलै) तिसरा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी करत भाजपाबरोबर हातमिळवणी केली, तसेच उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतली. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीच्या एकूण नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला नाही, अथवा कोणताही वेगळा गट स्थापन केलेला नाही, उलट ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे (सध्याचे मुख्यमंत्री) यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनीही शिवसेना पक्षावर दावा सांगितला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेमके किती आमदार शरद पवारांबरोबर आहेत आणि किती आमदार अजित पवारांबरोबर आहेत हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन तृतीयांश आमदार अजित पवारांबरोबर आहेत. तसेच भाजपा आणि शिंदे गटाकडून केलेल्या दाव्यांप्रमाणे अजित पवारांबरोबर ३० पेक्षा जास्त आमदार आहेत. हे सगळे केवळ दावे आहेत. अजित पवार अथवा शरद पवार यांच्याबरोबर असलेल्या आमदारांची नेमकी संख्या अद्याप कोणीही स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.
काही वेळापूर्वी जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, काल ज्या ९ जणांनी आमच्या पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भाजपाबरोबर शपथ घेण्याचं काम केलं त्याच क्षणी ते ९ जण अपात्र ठरतात. त्यासंबधातील याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. याबाबत मी आज सकाळी विधानसभा अध्यक्षांशी सविस्तर बोललो. आमची याचिका त्यांना मिळाली असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. ते त्यावर विचार करत आहेत असंही त्यांनी सांगितलं. आमचं म्हणणं मांडू द्यावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे.
जयंत पाटील म्हणाले, काल शपथविधीला गेलेले काहीजण, काही आमदार शरद पवार साहेबांना भेटायला गेले आहेत. राहिला प्रश्न आमच्याबरोबर किती लोक आहेत याचा तर आमच्याबरोबर सध्या ५३ वजा ९ म्हणजेच ४४ आमदार आहेत. आमची संख्या सध्या ९ जणांनी (आमदारांनी) कमी झाली आहे. कारण ते (शपथ घेणारे आमदार) आता गेलेलेच आहेत. उरलेले आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहेत.