राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते रविवारी आणि आज (१७ जुलै) असे सलग दोन दिवस मुंबईत शरद पवारांच्या भेटीला आले होते. या भेटींमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही गटांकडून सांगितलं जात आहे की, पक्ष एकसंघ राहावा यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवारांकडे केली आहे. शरद पवार यांनी ती मागणी ऐकून घेतली. परंतु त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, या भेटींमागे वेगळी राजकीय कारणं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडणाऱ्या घडामोडी शरद पवार यांच्या संमतीने होत असल्याचा आरोप केला जात आहे. तर काहींच्या मते अजित पवार यांच्या गटातील नेते अस्वस्थ असून ते परत शरद पवार यांच्या गटात परतण्याचा विचार करत असल्याचीही चर्चा आहे. काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्रकार परिषदेत याबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, आपल्या घरात कोणी आलं तर त्याच्यावर विश्लेषणात्मक टिप्पणी करणं योग्य नाही. ती सगळी मंडळी, शरद पवार यांना भेटायला आली होती. त्यांनी शरद पवार यांना पक्षात सध्या जे काही सुरू आहे, त्यावर मार्ग काढण्याची विनंती केली आहे.
यावेळी जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की, अजित पवार गटातील नेते अस्वस्थ आहेत का? किंवा ते नाराज आहेत का? त्यावर जयंत पाटील म्हणाले, यावर बोलणं योग्य नाही. त्यांनी केवळ शरद पवार यांना मार्ग काढण्याची विनंती केली. ते कसे दिसत होते, अस्वस्थ होते का, निराशा होते की नाराज होते, यावर टिप्पणी करणं योग्य नाही.
हे ही वाचा >> “शरद पवार म्हणाले तुम्ही आल्याशिवाय मी…”, जयंत पाटलांनी सांगितलं अजित पवारांच्या भेटीपूर्वी काय घडलं
जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांना जो कोणी भेटायला येतो, त्या प्रत्येकालाच ते भेटतात आमच्या पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं, त्याचा सन्मान ठेवणं, बोलणं, चर्चा करणं गरजेचं आहे. कारण, राजकारणात संवाद बंद करायचा नसतो. संवाद थांबवणं चुकीचं आहे. ते (अजित पवार गट) परत आले तर शरद पवार पुन्हा त्यांना भेटतील, त्यांच्याशी बोलतील.