गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीला गळती लागली आहे. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांमधील अनेक मोठ्या नेत्यांनी अलीकडच्या काळात महायुतीतल्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नेता भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपा शरद पवार गटाला आणखी एक धक्का देणार असल्याचं बोललं जातंय. पश्चिम महाराष्ट्रातला शरद पवार गटातील मोठा नेता म्हणजे त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, असा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे. पाटील यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा रंगलेली असताना त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे.
पत्रकार परिषदेत काही प्रतिनिधिंनी जयंत पाटील यांना, तुम्ही भाजपात जाणार असल्याची वारंवार चर्चा का होतेय? दर १०-१५ दिवसांनी तुमच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा होतात, तुमच्याबाबत असं का घडतंय? असे काही प्रश्न विचारले. यावर जयंत पाटील म्हणाले, १५ दिवस हे खूप जास्त झालं. दर आठ दिवसांनी माध्यमांवर माझ्याबद्दल चर्चा चालू असते. हे का होतंय ते तुम्ही पत्रकारांनीच शोधून काढलं पाहिजे. माझं एवढं काम तुम्ही करा. हे का होतंय, कोण घडवून आणतंय ते तेवढं तुम्ही शोधून काढा.
तुम्हाला महायुतीत महत्त्वाचं खातं दिलं जाईल अशीही चर्चा आहे. यावर जयंत पाटील म्हणाले, मी गेली १७ ते १८ वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलं आहे. त्यामुळे मंत्रिपद हे एकमेव मोठं प्रलोभन असू शकत नाही. यावेळी पाटील यांना विचारण्यात आलं की, तुमच्याबद्दल अशी चर्चा कोण घडवून आणतंय? कोणी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, मी या चर्चांकडे, बातम्यांकडे सकारात्मकतेने पाहतो. तुम्ही वृत्तवाहिन्या या बातम्यांना प्रसिद्धी देताय. परंतु, माझा प्रसारमाध्यमांवर राग नाही. या बातम्यांच्या निमित्ताने तेवढाच वेळ आमचा लोकांशी संपर्क होतो. या संपर्काचं श्रेय तुम्हा प्रसारमाध्यमांना द्ययला हवं. परंतु, तुम्ही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जबाबारी घ्यावी आणि कोण सतत माझ्या नावाची चर्चा घडवून आणतंय तेवढं शोधून काढा.
हे ही वाचा >> “आमचा पक्ष फुटला आहे, आता…”; जयंत पाटील यांचं महत्त्वाचं वक्तव्य
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी देशभर पक्षाची मोर्चेबांधणी करत आहे. एकेक मतदारसंघ कसा मजबूत होईल यावर पक्षाचे नेते मेहनत घेत आहेत. अशातच गेल्या काही महिन्यांमध्ये इंडिया आघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षांमधील नेत्यांनी भाजपा आणि मित्रपक्षांमध्ये (एनडीएतील इतर पक्ष) प्रवेश केला आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील इंडिया आघाडीतले काही पक्ष एनडीएत सहभागी झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल, जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदलाने काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीशी फारकत घेत भाजपाशी घरोबा केला आहे. महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभारत काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अनुक्रमे शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ आता जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.