राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? शरद पवारांचा की अजित पवारांचा? हा वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. अजित पवारांनी पक्षातील आमदार खासदारांना बरोबर घेत वेगळा गट बनवला आणि थेट पक्षावर दावा केला. याला शरद पवार गटाने आव्हान दिलं आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगात आज (६ ऑक्टोबर) सुनावणी झाली. या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह गोठवलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा शरद पवारांचा पक्ष आहे आणि घड्याळ हे त्यांचं चिन्ह आहे. ते गोठवण्याचा प्रश्नच येत नाही. उद्या कोणीही भाजपाच्या चिन्हाबाबत शंका उपस्थित केली तर त्यांचं चिन्ह तुम्ही गोठवणार का? खूप सोपी गोष्ट आहे. शरद पवार हे या पक्षाचे संस्थापक आहेत. हा त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला पक्ष आहे. त्यांना कोणीच आव्हान दिलं नाही.
हे ही वाचा >> Nobel Peace Prize : १३ वेळा अटक, चाबकाचे १५४ फटके अन् ३१ वर्ष तुरुंगवास, नर्गिस मोहम्मदींना यंदाचं शांततेचं नोबेल
जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांना सर्वांनी सर्वाधिकार दिले आहेत. तालकटोरा स्टेडियममध्ये (दिल्ली) सर्वांनी हात वर करून शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्याच्या व्हिडीओ क्लिप्स, फोटो आणि इतर पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे आजही देशातील पक्षाचे सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष हे शरद पवारांना पाठिंबा देतात. त्यामुळे चिन्ह गोठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चिन्ह गोठवणं हे अन्यायकारक होणार आहे. मुळात चिन्ह गोठवण्याची एक पद्धत आहे आणि आमच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर तसा युक्तिवाद केला असेल. त्याचबरोबर चिन्ह गोठवू नका अशी विनंती केली असेल.