लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं. लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ४०० पारचा दावा केला होता. मात्र भाजपाला लोकसभा निवडणुकीत २३९ जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसला ९९ जागा जिंकता आल्या. तसेच इंडिया आघाडीला मिळून २३२ जागांवर विजय मिळवता आला. असं असलं तरी भाजपाचं ४०० पारचं भाजपाचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. सध्या केंद्रात एनडीए आघाडीचं सरकार असल्याने हे सरकार कधीही कोसळू शकतं, अशी टीका विरोधक करतात.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एनेकदा टीका करताना केंद्रातील एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं, असं म्हटलं होतं. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही अनेकवेळा बोलताना एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं, असं विधान केलं होतं. यानंतर आता शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रातील एनडीए सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. “पुढील चार महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार आहे”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. साताऱ्यातील एका कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला; म्हणाले, “उपोषण करण्यापेक्षा…”
जयंत पाटील काय म्हणाले?
“पुढच्या चार महिन्यात केंद्रातील सरकार बदलणार आहे. त्यानंतर काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवलेला आहे. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल. मी देखील इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे. त्यामुळे हे सांगत आहे”, असं मोठं विधान शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलं आहे.
जयंत पाटील यांचा विधानपरिषदेत पराभव
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. जयंत पाटील यांना या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी देत एक प्रकारे जयंत पाटील यांना मदत करण्यास नकार दिल्याची चर्चा होती. तसेच काँग्रेसचेही काही मते फुटल्याचं बोललं जातं. दरम्यान, या सर्व घडामोडी पाहता महाविकास आघाडीत एका मित्र पक्षाच्या उमेदवाराला निवडून आलता आलं नाही, अशी टीका आता सत्ताधारी पक्षातील नेते महाविकास आघाडीवर करत आहेत.