आज सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्रातला एक बडा नेता भाजपात जाणार अशी चर्चा रंगली आहे. भाजपा शरद पवार गटाला आणखी एक धक्का देणार असंही बोललं जातं आहे. तसंच हे नाव दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं नसून जयंत पाटील यांचं आहे. जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा आज सकाळपासून रंगली आहे. या सगळ्या चर्चांवर दस्तुरखुद्द जयंत पाटील यांनी मौन सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. या निवडणुकीच्या तोंडावर देशपातळीवर भाजपात आणि एनडीएत इनकमिंग वाढलं आहे. तर महाराष्ट्रात महायुतीमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेले. काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे हे नेते महायुतीत गेले. आता आज सकाळपासूनच जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली आहे. मोदींची गॅरंटी आणि आत्मनिर्भर भारत संकल्पाला साथ देण्यासाठी अनेक लोक आमच्याकडे येण्याची तयारी करत आहेत. काहीजण तयारीत आहेत. परंतु, तुम्हा पत्रकारांकडे असलेली माहिती माझ्याकडे नाही. परंतु कधीही काहीही होऊ शकतं. मोदींना साथ देण्यासाठी कोणीही आमच्याकडे येऊ शकतं.”

हे पण वाचा- “एवढं करून त्यांना कॉन्फिडन्स नाहीये की…”, सुप्रिया सुळेंचा भाजपाला टोला; जयंत पाटलांविषयीच्या चर्चेवरही दिली प्रतिक्रिया!

“जयंत पाटील आणि माझी कुठेही, कसलीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमच्या पक्षात येण्यासाठी संपर्क केलेला नाही. किंवा त्यांचं माझ्याशी काही बोलणं झालेलं नाही. या कदाचित कपोकल्पित बातम्या असतील. तरीही पंतप्रधान मोदींना साथ देण्यासाठी आमच्याकडे कोणीही येऊ शकतं.” असंही बावनकुळे म्हणाले. यानंतर आता जयंत पाटील यांनीच भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

हे पण वाचा- भाजपाने महाविकास आघाडीला सुरूंग कसा लावला?

जयंत पाटील यांनी काय म्हटलं आहे?

“काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलंच आहे. प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोर जाता येतं. आपण यावर नंतर बोलू.” असं म्हणत जयंत पाटील यांनी या सगळ्या गोष्टींवर मौन सोडलं आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी अवघ्या तीन ओळींत ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिली तेव्हा जयंत पाटील रडले होते. शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांचा विषय त्यांनी अवघ्या तीन ओळींमध्ये संपवला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil breaks silence on bjp entry rumours what did he said scj