राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवारांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून आज शरद पवारांनीच नियुक्त केलेल्या अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीमध्ये शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता शरद पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान, बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या दाव्याची चर्चा होऊ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी ठराव एकमताने मंजूर झाला असून कुणाचाही विरोध नव्हता, अशी माहिती दिली आहे. “कुणाचीही नाराजी नव्हती. सगळ्यांचं एकमत होतं. कुणीही याला विरोध केला नाही.चाकोंनी देशातल्या वेगवेगळ्या राज्यांत शरद पवाराबद्दल स्थानिक किती आग्रहानं मागणी करत आहेत याची आम्हाला माहिती दिली”, असं जयंत पाटील म्हणाले.

“देशातल्या विविध नेत्यांनी फोन करून शरद पवारांना विनंती केली. निवडणुकांचा कालावधी असेपर्यंत तुम्ही असा निर्णय घेणं उचित नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शरद पवारच अध्यक्षपदी राहावेत, असा ठराव मंजूर केला. शरद पवारांना पर्याय नाही”, अशी ठाम भूमिका जयंत पाटील यांनी यावेळी घेतली.

शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला, अध्यक्षपदाचा पेच कायम; धनंजय मुंडे म्हणतात, “पक्षातील लोकशाहीत…”

हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय स्टंट?

हा सगळा राजकीय स्टंट असल्याची टीका होत असल्याचं माध्यमांनी विचारलं असता त्यावरही जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. “ही बोलण्याची पद्धत असते. पण हा आमच्या पक्षाचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होता. काल संध्याकाळी मी शरद पवारांशी चर्चा केली. तोपर्यंत ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. पण आता आम्ही हा ठराव मंजूर केला आहे”, असं ते म्हणाले. “शरद पवारांनी बाजूला होणं हाच मुळात धक्का होता. त्यामुळेच पक्षातले लाखो कार्यकर्ते अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांची अस्वस्थता ते व्यक्त करत होते”, असं ते म्हणाले.

शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या ‘कोअर कमिटी’ने फेटाळला; माहिती देत प्रफुल्ल पटेल म्हणाले, “कुणालाही विश्वासात न घेता…”

“मविआ अभेद्यच राहील. राष्ट्रवादीचा हा पक्षांतर्गत प्रश्न होता. हा आमचा राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न होता. पण मविकास आघाडीबाबत वेगळा विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil claims sharad pawar firm on resignation as ncp chief pmw