मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत आणि त्यांच्या भूमिकेबाबत बारसकर महाराजांनी काही आरोप केले. त्या आरोपांना काही दिवस होतात न होतात तोच गुरुवारी संगीता वानखेडे या मराठा आंदोलक महिलेनेही मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. इतकंच नाही तर शरद पवारांचा हात या आंदोलनामागे आहे. मनोज जरांगेंच्या सगळ्या आंदोलनांचा खर्च शरद पवारांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील जसं शरद पवार सांगतात तसंच ऐकतात असंही संगीता वानखेडे म्हणाल्या. या सगळ्या आरोपांवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाल्या संगीता वानखेडे?
“महाराष्ट्राला मनोज जरांगेंनी वेड्यात काढलं आहे. त्यांचं सुरुवातीपासून चुकतच आलं आहे. सरकारने दंगल घडली की घडवली त्याचा शोध घेतला पाहिजे. पोलिसांनी जो लाठीचार्ज झाला तेव्हा महाराष्ट्राचा उद्रेक दिसला. मनोज जरांगे पाटील कोण हे आधी मीडियाला माहीत नव्हतं. लाठीचार्ज झाल्यानंतर त्यांना डोक्यावर घेतलं. डॉ. प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले. त्यानंतर मनोज जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यामुळेच मी त्यांच्याशी जोडले होते. मनोज जरांगे साधासुधा माणूस, आपल्या भाषेत बोलणारा माणूस म्हणून महाराष्ट्राने आणि मी विश्वास ठेवला होता. मी एक महिन्यापूर्वी पर्यंत त्यांच्यासह होते. पण आता मी त्यांच्यासह नाही.”
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार
मनोज जरांगेंनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला नीट उत्तर दिलं नाही. शरद पवार जेव्हा भेटायला गेले तेव्हा यांची भाषा बदलली होती. त्यावेळी मला वाटलं होतं मराठ्यांना आरक्षण मिळतंय ना? चांगलं होतं आहे. म्हणून मी साथ दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले की हा लगेच गुन्हे मागे घेण्याची मागणी करतो असाही आरोप संगीता वानखेडे यांनी केला. जे शरद पवारांना हवंय तेच या माणसाला पाहिजे आहे. या सगळ्यामागे शरद पवार आहेत. कारण शरद पवारांचा पक्ष संपला आहे. त्यामुळे राडा, गोंधळ आणि राडा घातला जातो आहे. शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच मनोज जरांगे वागतो असाही आरोप संगीता वानखेडेंनी केला. या सगळ्यावर आता जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हे पण वाचा- “..तर जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”, छगन भुजबळ यांची पोलिसांकडे मागणी
जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्याशी कधीही आदरणीय शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असावे असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतोय? याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे” अशी सूचना त्यांनी केली.