२०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. राज्यात आता महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजपा असे दोन गट पडल्यामुळे २०२४ साली कोण मुख्यमंत्री होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख करत चांगलीच टोलेबाजी केली आहे. ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
…ते ठरवण्याचा मला अधिकार नाही
२०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आले तर कोण मुख्यमंत्री होणार, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे जयंत पाटील यांनी थेट उत्तर दिले नाही. “महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, हे तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील. ते ठरवण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी बांधील नाही,” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >> “२०२४ मध्ये अनेक मोठे धक्के,” देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर जयंत पाटलांचे उत्तर; म्हणाले, “लोक फार हुशार…”
….त्या प्रश्नाचे उत्तर या दोघांनाही माहिती नाही
याच प्रश्नावर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अचानकपणे मिळालेले उपमुख्यमंत्रीपद यावर मिश्किल टिप्पणी केली. “हाच प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना विचारायला हवा होता. कारण भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार या प्रश्नाचे उत्तर या दोघांनाही माहिती नाही. पूर्वी तशी परिस्थिती नव्हती. अगोदर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अस म्हटले जायचे. मात्र या सर्व लोकांनी फडणवीसांना यावेळी मुख्यमंत्री होऊ दिलं नाही,” असे मिश्किल भाष्य जयंत पाटील यांनी केले.
फक्त शपथ घेणे बाकी होते मात्र…
“बहुमत हातात होते. फक्त शपथ घेणे बाकी होते. मात्र ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. मात्र देवेंद्र फडणवीस यांना एवढं सोपं समजू नका. ते गोड बोलतात, गोड हसतात. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना लाईटली घेऊ नये. या सर्वांना (भाजपाच्या नेत्यांना) ते कधी पोहोचवून येतील हे समजणारही नाही,” अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी मारली.
हेही वाचा >> अशोक चव्हाण यांची मुलगी खरंच राजकारणात सक्रिय होणार? खुद्द अशोक चव्हाण यांनीच दिलं उत्तर; म्हणाले, ” माझ्या मुलींना…”
“मी सुधीर मुनगंटीवार यांचा हितचिंतक आहे. ते अर्थमंत्री होते. त्यांनी वेगवेगळी खाती सांभाळलेली आहेत. मात्र ते फार आक्रमक होत नाही,” असा टोलाही जयंत पाटलांनी मुनगंटीवार यांना लगावला.