शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभारातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. मात्र याच दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांत चढाओढ सुरू आहे. शिवाजी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास कोणाला परवानगी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. शिवाजी पार्कवरवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची एक परंपरा आहे. ही परंपरा उद्धव ठाकरे यांनी पुढे चालवली आहे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांना दसरा मेळाव्याचे आमंत्रण दिले तर जाणार का? या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा>>> लिफ्टमध्ये अचानक झाला तांत्रिक बिघाड, मुंबईत २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू
बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून दसरा मेळाव्याची परंपरा आहे. हीच परंपरा उद्धव ठाकरे यांनी पुढे चालवलेली आहे. यापुढेही ही परंपरा चालू राहावी ही महाराष्ट्राची इच्छा आहे, असे जयंत पाटील म्हणाले. पुढे बोलताना शिवसेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण दिले तर जाणार का? असे विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना, दसरा मेळाव्यासाठी इतर पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिले जात नाही. तो त्यांच्या पक्षाचा मेळावा असतो. त्यांनी याआधी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिलेले आहे, असे माझ्या ऐकीवात नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा>>> राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर; बैठका, चर्चा अन् बरंच काही; ‘असं’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’
जयंत पाटील यांनी वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पावरही प्रतिक्रिया दिली. आधीच्या सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फॉक्सकॉनला एक पत्र लिहिले होते. दोन दिवसांत आप एमओयू करू आणि मंत्रीमंडळापुढे हा प्रस्ताव मांडू असे या पत्रात लिहिलेले होते. सगळे सुरळीत सुरू होते. मात्र अचानक प्रकल्प गेला. यामध्ये राज्य सरकार दोषी आहे. दुसऱ्या कोणाचाही यामध्ये दोष नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.