कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या खात्यावरून झालेल्या वादग्रस्त ट्वीटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. ते ट्वीट माझं नाही असं म्हणणं धादांत खोटं आहे आणि हा खोटेपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमूटपणे सहन करत आहेत, असा आरोप जयंत पाटलांनी केला. ते शुक्रवारी (१६ डिसेंबर) सांगलीत बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते माझे ट्वीट नाही. हे किती धादांत खोटे आहे. हा खोटेपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमूटपणे सहन करत आहेत.केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दारात गेल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात ते ट्वीट त्यांचे नाही. ट्वीट त्यांचे नसेल, तर मग ते अद्याप डिलीट कसे झाले नाही?”
“आमचे मुख्यमंत्री त्यांना शरण गेले आहेत का?”
“ज्या दिवशी ट्वीट आले त्यादिवशी त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवे होते. हा जाब आमच्या मुख्यमंत्र्यांनी विचारला नाही. त्यामुळे आमचे मुख्यमंत्री त्यांना शरण गेले आहेत का?” असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
“मविआच्या एकजुटीचे उत्तर शिंदे टोळी आणि भाजपाला महामोर्चात मिळेल”
जयंत पाटील पुढे म्हणाले, “मविआच्या एकजुटीचे उत्तर शिंदे टोळी आणि भाजपाला महामोर्चात मिळेल. राज्यभरातून तसेच ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे अशा मुंबईच्या जवळ असलेल्या भागातील लोक लाखो संख्येने येणार आहेत. महाराष्ट्रप्रेमी संपूर्ण ताकदीने मोर्चात उतरणार आहेत.”
“सरकारला कसली भीती आहे?”
“महामोर्चाची गर्दी पाहून नक्कीच राज्यकर्त्यांच्या छातीत धडकी भरेल. हे सरकार भित्रे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सरकार का घेत नाही? सरकारला कसली भीती आहे?” असा प्रश्नही जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : “या सरकारचा आत्मविश्वास कमी झालाय, यांचं गुजरातपुढे…”, जयंत पाटलांचं टीकास्र!
“हे आमदार मॅनेज करणारे सरकार आहे”
“विकासाचा आणि या सरकारचा काही संबंध नाही. हे आमदार मॅनेज करणारे सरकार आहे. जनतेशी यांना काही देणे घेणे नाही. कर्नाटकात निवडणूक आहे म्हणून आता सीमावाद काढला जात आहे. सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने मांडलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या विरोधातलीच आहे. ती महाराष्ट्राच्या हिताची भूमिका नाही. निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत हा वाद असाच ठेवला जाईल,” असेही जयंत पाटील यांनी म्हटलं.