राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लखीमपूरमधील हत्याकांडाच्या विरोधातील महाराष्ट्र बंदला विरोध करणाऱ्या भाजपावर सडकून टीका केलीय. लखीमपूरमधील हत्याकांडाची तुलना केवळ जालियनवाला बाग हत्याकांडाशीच होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल. या बंदला विरोध म्हणजे भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन आहे, असंही मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. ते मुंबईतील बंदमध्ये सहभागी झाले असताना बोलत होते.

” लखीमपूरसारखी घटना म्हणजे जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड”

जयंत पाटील म्हणाले, “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. भाजपला त्यांचं राजकीय मत आग्रहाने मांडायचं आहे हे समजू शकतो, पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे.”

“लखीमपूर हत्याकांडाचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल”

“भाजपाच्या मंत्र्यांच्या चिरंजीवांनी हे हत्याकांड केलंय. अद्यापही त्याला अटक होत नाही, त्याला सन्मानाने बोलावलं जातं. भाजपाला शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचं काम करायचं आहे. त्याचा निषेध म्हणून मविआच्या सर्वच पक्षांनी हा बंद पुकारला आहे. लखीमपूर हत्याकांडाची जालीयनवाला बाग हत्याकांडाशीच तुलना होऊ शकते. त्याचा महाराष्ट्रातील घराघरातून निषेध होईल,” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : लखीमपूरमध्ये हिंदू विरुद्ध शिख वाद तयार करण्याचा प्रयत्न, वरुण गांधींचा गंभीर आरोप

“भाजपा महाराष्ट्र बंदला विरोध करून लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचं जे हत्याकांड झालं, शेतकऱ्यांना चिरडून मारलं त्याचं अप्रत्यक्ष समर्थन करत आहे. भाजपच्या शेतकरी विरोधी गोष्टींना सर्वच स्तरातून विरोध होतोय. आम्ही बंद कुणावरही लादत नाहीये. त्यामुळे बहुतेक ठिकाणी लोकच यात सहभागी झालेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

Story img Loader