वेदान्त कंपनीने आपला सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थलांतर केल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका होते आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभेतील एक व्हिडिओही शेअर केला आहे.

हेही वाचा – “चाळीस गद्दारांनी सरकार पाडल्याने प्रकल्प…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी गरबा…”

काय म्हणाले जयंत पाटील?

“अनेक उद्योगपती येतात. ते वेदांता वालेही आले होते जवळपास ४ लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करत आहेत”, असं विधान २५ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केले होते. त्यानंतर फक्त २० दिवसांत एवढा मोठा बदल कसा घडला? यात कोणाचा हस्तक्षेप होता? कोणाचा दबाव होता याचे उत्तर संपूर्ण राज्यातील जनतेला व विशेषतः युवा वर्गाला अपेक्षित आहे, असे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्पाबाबत महाराष्ट्राशी चर्चा सुरू केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात ‘वेदान्त ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वेदान्तने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीशी भागीदारी केली असून, या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र, मंगळवारी वेदांत समूहाने आपला प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि महाराष्ट्राकडे येऊ घातलेला आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर विरोधकांडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

Story img Loader