शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज शिबिरात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुजरात निडवणुकीवरून पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला. तसेच राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही त्यांनी बोचरी टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘पार्सल’ म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना सुषमा अंधारेंनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या…

काय म्हणाले जयंत पाटील?

“पश्चिम बंगालमध्ये मागे एकदा पूल पडला होता. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘पूल पडणे हा राज्यातील सरकार बदलाचा ईश्वरीय संकेत आहे’. जर हा सरकार बदलाचा ईश्वरीय संकेत असेल, तर गुजरातमध्ये नुकताच मोरबी येथील पूल कोळला आहे. मग हा ईश्वरीय संकेत गुजरातमध्ये मिळाला आहे, असे म्हणायला काही हरकत नाही”, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा

यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. “राज्यात नवं सरकार आले आहे. नव्या नवलाईचे दिवस आहेत. आमची काही तक्रार नाही. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांना चहा घेता का? असं विचारणारा आणि त्याने नाही म्हटल्यावर दारू घेता का? असे विचारणारा मंत्री या सरकारमध्ये आहे. त्यामुळे राज्य सरकार कोणत्या स्थरावर गेलेलं आहे हे लोकांना लक्षात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने…”; गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

अंधेरी पोटनिडवणुकीवरून भाजपावर टीका

अंधेरी पोटनिडवणुकीत माघार घेतल्यावरूनही त्यांनी भाजपावर टीकास्र सोडले. “नुकताच अंधेरीची पोटनिवडणूक झाली. या निडणुकीत भाजपावर माघार घेण्याची नामुष्की ओढवली. त्याला त्यांनी ‘महाराष्ट्राची संस्कृती’चे नाव दिले. मग ही संस्कृती कोल्हापूर आणि पंढरपूरच्या निवडणुकीत कुठं गेली होती? असा प्रश्न त्यांनी भाजपाला विचारला. सोयीचं असेल तसं राजकारण करायचं आणि आपण बोललेलं वाजतं हा आत्मविश्वास असणाऱ्या लोकांबरोबर आमची लढाई आहे”, असेही ते म्हणाले.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

दरम्यान, “राज्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात जिथे-जिथे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे, तिथे ओला दुष्काळ जाहीर करावी”, अशी मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil criticized pm narendra modi bjp shinde government in shirdi ncp meeting spb