एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही गटातील लढाई आता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. असे असताना एकनाथ शिंदे गटाने मोठा निर्णय घेतला आहे आहे. शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रती सेनाभवन उभारण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. असे असताना शिंदे गटाच्या या प्रति सेनाभवनावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिशिवसेनाभवन बांधलं तरी देव पहिल्या शिवसेना भवनात आहे, असे विधान पाटील यांनी केले. याबाबतचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.
हेही वाचा >>> चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड; आशिष शेलारांकडे मुंबईची जबाबदारी
“एकनाथ शिंदे गट नवे सेनाभवन बांधू शकेल. त्यांची ताकद फार मोठी आहे. सत्तांतरावेळी सुरतपासून जो प्रवास झाला त्यातून त्यांनी ताकद दाखवून दिली आहे. ते प्रतिसेनाभवन बांधतील. मात्र मंदिर बांधलं तरी त्या मंदिरामध्ये देव असावा लागतो. तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे,” असे जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा >>>“आगामी निवडणुकीत..,” प्रदेशाध्य़क्षपदाची जबाबदारी मिळताच बावनकुळेंनी सांगितला भाजपाचा ‘फ्यूचर प्लॅन,’ म्हणाले…
मिळालेल्या माहितीनुसार दादरमध्ये शिंदे गटाचे मुख्य कार्यालय उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या कार्यालयातून जनतेच्या समस्या जाणून घेणार आहेत. मुंबईच्या प्रत्येक प्रभागामध्ये या प्रतिसेना भवनाचे कार्यालय असेल. येत्या १५ दिवसांमध्ये या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार असून मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आले असल्याचे शिंदे गटातील सदा सरवणकर यांनी सांगितले आहे.