सोलापूर : महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा वापरून रोज नवनवे प्रश्न करून अन्याय-अत्याचाराच्या गोष्टी घडत आहेत. त्यातून महाराष्ट्र समाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या अडचणीत आणले तरी भविष्यात हा पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>> Breaking: अखेर शरद पवार गटाला नाव मिळालं, ‘या’ नावावर निवडणूक आयोगाचं शिक्कामोर्तब!
माढा लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी दौरा करून टेंभुर्णी (ता. माढा ) येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांचा मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळाचे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. कणाहीन निवडणूक आयोगाकडून न्यायाची अपेक्षा करता येणार नाही. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्वादी काँग्रेस पक्ष आहे. देशातील विविध २८ राज्यांत हा पक्ष विखुरला आहे. त्यापैकी २३ राज्यांतील पक्ष प्रमुखांनी शरद पवार यांच्याच नेतृत्वाला पाठिंबा दिला आहे. परंतु ही वस्तुस्थिती असताना निवडणूक आयोगाने केवळ महाराष्ट्र विधिमंडळातील बहुसंख्य सदस्य एका बाजूने गेले म्हणून हा चुकीचा निर्णय दिला आहे,असे जयंत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>> “घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना….”, लेखक अरविंद जगताप यांची सूचक पोस्ट चर्चेत
माढा मतदारसंघात शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या महिलांना धमक्या दिल्या जातात. परंतु कोणी कितीही त्रास दिला तरी उज्ज्वल भविष्यकाळ आमचाच आहे. पक्ष आणि चिन्ह पळविले गेले. परंतु शरद पवार यांच्यावर असलेले सामान्य माणसाचे प्रेम कोणीही हिरावून नेणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. माढा भागासह सोलापूर जिल्ह्यात अभिजित पाटील यांच्यासारख्या नेत्यालाही शरद पवारांची साथ सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे. बंद पडलेला साखर कारखाना त्यांनी चालवायला घेतला आणि उत्तमप्रकारे चालवून दाखविला आहे. एवढेच नव्हे तर शेतक-यांच्या उसाला चांगला भाव देऊन माढा भागात ऊस दराची स्पर्धा लावली आहे. परंतु अभिजित पाटील यांच्यावर केवळ राजकीय दबावातून त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र शिखर बँकेकडून जाणीवपूर्वक कारवाई करून त्यांना त्रास दिला जात असला तरी न्यायालयीन लढाईत ते यशस्वी होतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.