राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बहुसंख्य आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. जेष्ठ नेत्यांच्या आशीर्वादानेच आम्ही ही भूमिका घेतली आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका नेमकी काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आता जयंत पाटील यांनी स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी साहेबांबरोबर” असं ट्वीट जयंत पाटलांनी केलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही अजित पवारांच्या बंडखोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, “पक्षाच्या काही सदस्यांनी विशेषत: विधीमंडळाच्या सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली आहे, याचं चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांच्या समोर येईल. याचं कारण बंडखोरीमध्ये ज्यांची नावं आहेत, त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधला आहे. आम्हाला याठिकाणी निमंत्रित करून आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे. आमची भूमिका कायम आहे, याचा खुलासा अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे याबाबत मी आताच काही बोलू इच्छित नाही.”
हेही वाचा- “बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधलाय, येत्या दोन दिवसांत…”, शरद पवारांचं महत्त्वाचं विधान
“बंडखोरीबाबतचं अधिक स्पष्ट चित्र माझ्या इतकेच जनतेच्या समोर मांडण्याची आवश्यकता आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) जर त्यांची भूमिका जनतेसमोर मांडली तर त्याबद्दल माझा विश्वास बसेल. त्यांनी तशी भूमिका मांडली नाही, तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
हेही वाचा- अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शरद पवार पुढे म्हणाले, “आता प्रश्न राहिला पक्षाच्या भवितव्याबद्दल… तर आज जो प्रकार घडला आहे, तो इतरांसाठी नवीन असेल माझ्यासाठी नवीन नाही. मला आठवतंय १९८० साली मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो. तेव्हा ५८ आमदार निवडून आणले होते. पण एक महिन्यानंतर ५८ पैकी ६ आमदारांव्यतिरिक्त सगळे आमदार पक्ष सोडून गेले. मी ५८ आमदारांचा नेता होतो. त्यानंतर मी केवळ पाच आमदारांचा नेता झालो. त्या पाच लोकांना घेऊन मी पुन्हा पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी करायची हाच माझा उद्देश होता. पाच वर्षांनी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीचं चित्र वेगळं होतं. आम्ही अधिक जागा जिंकल्या होत्या.”