कोकणातील खारलॅण्डच्या प्रश्नावर योजनामधील भ्रष्टाचार यासंदर्भात येत्या १७ तारखेला नागपूरच्या विधानभवनावर शेकाप मोर्चा काढणार आहे. मात्र खारलॅण्ड विभागाच्या भ्रष्टाचाराचा जागर करणारे शेकापनेते खारभूमीच्या योजना गिळंकृत करीत असल्याचा आरोप माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केला आहे.
 कोकणातील खारलॅण्ड प्रश्नावर आंदोलने छेडण्याची भाषा करणाऱ्या शेकाप आमदार जयंत पाटील यांनी शहबाज येथील शासकीय खारभूमी योजना गिळंकृत केल्याचा आरोप माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केला आहे. आमदार जयंत पाटील यांच्या पीएनपी मेरीटाइम कंपनीने शहाबाज १ कोटी ४५ लाख रुपये खर्चून राबविण्यात आलेली शासकीय खारबंदिस्ती योजना नष्ट केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
 याप्रकरणी शहाबाज येथील संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्यानंतर खारलॅण्ड विभागाने ही योजना पीएनपी कंपनीने केलेल्या भरावात नष्ट झाल्याचे मान्य केले आहे. पीएनपी कंपनीने रेल्वेलाइनसाठी केलेल्या भरावात शहाबाज योजनेतील बांध आणि उघडय़ादेखील नष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. कंपनीच्या या भरावामुळे योजनेतील करोडो रुपये खर्चून बांधण्यात आलेली बांधबंदिस्ती नष्ट झाली आहे. आमदार जयंत पाटील यांच्या या कंपनीने केलेल्या या बेकायदेशीर भरावामुळे शासकीय मालमत्तेचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर तसेच त्यांच्या कंपनीच्या संचालकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे. तसेच कंपनीकडून सदरची रक्कम वसूल करावी, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.
याप्रकरणी शहाबाज बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेश म्हात्रे आणि उपाध्यक्ष द्वारकानाथ पाटील यांनी कार्यकारी अभियंता खारभूमी विभाग यांना लेखी पत्र दिले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. आमदार जयंत पाटील यांनी नागपूर येथील मोर्चादरम्यान याबाबतचा खुलासा करावा, असे आव्हान ठाकूर यांनी दिले.

Story img Loader