Jayant Patil भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जयंत पाटील यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ही भेट झाली असल्याचं जयंत पाटील यांनीच स्पष्ट केलं आहे. तसंच या भेटीदरम्यान काय चर्चा झाली त्याचा तपशीलही त्यांनी दिला आहे.

महायुतीला निवडणुकीत घवघवीत यश

महाराष्ट्रात महायुतीचं सरकार नोव्हेंबर २०२४ मध्ये पुन्हा आलं. कारण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. राज्यात युती आणि आघाडी सरकारचा ट्रेंड कायमच राहिला आहे. सगळा इतिहास लक्षात घेतला तर पहिल्यांदाच कुठल्या तरी युतीला २८८ पैकी २३७ जागा मिळाल्या आहेत. यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते हे महायुतीत जातील अशा चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चा रंगून थांबलेल्या असतानाच जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी भेट झाल्याचं म्हटलं आहे. तसंच ही भेट कशासाठी होती? हेदेखील सांगितलं आहे.

जयंत पाटील यांनी काय म्हटलं आहे?

“सोमवारी संध्याकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि माझी त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. सांगली जिल्ह्यातील काही महसूल प्रश्नांवर मी त्यांना १० ते १२ निवेदनं दिली. ती निवदेनं देण्यासाठीच मी भेट मागितली होती. महसूल विभागात काही गोष्टी ऑनलाइन केल्या आहेत त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतो आहे. त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते. मला ६ वाजण्याची वेळ दिली गेली होती. आमच्यात २५ मिनिटं चर्चा झाली. राधाकृष्ण विखे पाटीलही होते. आमची कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. मी इतर चर्चा कुठलीही केलेली नाही. सुमारे १३ ते १४ निवेदनं दिली आहेत. मी माझ्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन त्यांना भेटलो.” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

राजकीय भेट नसल्याचं जयंत पाटील यांनी केलं स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडलेली नाही. मात्र विधानसभा निवडणूक झाल्यापासून शरद पवारांच्या पक्षातले नेते फुटतील आणि महायुतीत जातील अशी शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र जयंत पाटील यांनी आमची भेट राजकीय वगैरे काहीही नव्हती. सांगलीतले प्रश्न घेऊन भेट घेतली असं सांगितलं आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरु झालेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Story img Loader