निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत दिलेला निकाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या निकालाबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून तर्क-वितर्क व्यक्त होत असताना दुसरीकडे उल्हासनगरमध्ये एका पोलीस स्थानकात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा मुद्दाही तापला आहे. यासंदर्भात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी कर्जमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दांमध्ये टिप्पणी केली.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील यांनी गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावरून राजकीय टोलेबाजी केली. “पूर्वी पोलीस स्थानकात जाण्याची प्रथा नव्हती. फारतर असं सांगितलं जायचं की योग्य तो न्याय करा. पण आता पोलीस स्थानकात जाऊन गोळीबार केल्याशिवाय न्याय मिळत नाही, अशी भाजपाच्या एका आमदाराची खात्री झाली आहे. हा आमदार पोलीस स्थानकात जातो. पाच गोळ्या झाडल्या असं माध्यमांना ठामपणे सांगतो. ज्याला गोळी लागली तो आहे की गेला हे कळायला मार्ग नाही. त्यावर चर्चा नाही. ज्याला गोळी लागली तो सत्तेत असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा पदाधिकारी होता. त्यांच्यावर भाजपाच्या आमदाराने जाऊन गोळ्या झाडल्या. एवढी गंभीर घटना आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
“मुंबईच्या आसपास सगळीकडे या गँग आहेत. जमिनी हडप करणे, एकमेकांच्या असतील तर त्यात घुसखोरी करणे, जमिनींची परस्पर विल्हेवाट लावणे, या अशा ठाणे जिल्ह्याच्या उपनगरातल्या समस्या आहेत”, असंही ते म्हणाले.
“१०५ आमदार असाणऱ्या पक्षाचा आमदार…”
यावेळी जयंत पाटील यांनी भाजपावरही तोंडसुख घेतलं. “गोळी झाडणारे आमदार म्हणतात ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली. ते भाजपासोबतही गद्दारी करणार आहेत. त्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब केलं. ते मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यात फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचं काम ते करत आहेत. त्यांनी माझे कोट्यवधी रुपये खाल्ले. त्यांनी व त्यांच्या मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे’. हे आम्ही म्हणत नाही. १०५ आमदार असणाऱ्या पक्षाचा एक आमदार गोळीबार केल्यानंतर हे म्हणतोय. याची चौकशी व्हायला पाहिजे की नाही? किमान करोडो रुपये खाल्ले याची तरी चौकशी करा”, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
“हे सहन करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही”
“महाराष्ट्रात असा प्रकार आपण कधीच ऐकला नव्हता. भाजपाच्या आमदाराने केलेल्या गोळीबाराचा निषेध म्हणून तो जे बोलला त्यावर एकनाथ शिंदे गटाचे सगळे आमदार व मंत्री मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणं घेऊन गेले. पण हे सहन करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. ते ज्यांच्याकडे आपली कैफियत घेऊन गेले, त्या बिचाऱ्या माणसानं सगळं सहन करायचंच ठरवलं आहे. त्याच्या हातात काही नाही. सत्ता असेलही. महाराष्ट्रात राजकारणाचं गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांना राजकारणात आणण्याचं काम चाललेलं आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण असा अनेकजण उल्लेख करतात”, असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.