नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीपाठोपाठ आज महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन करणारी भाषणं केली. यावेळी नार्वेकरांनी त्यांच्या याआधीच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांना सदस्यांनी उजाळा दिला. त्यात सर्वाधिक महत्त्वाच्या ठरलेल्या सेना-राष्ट्रवादी पक्षफुटीच्या प्रकरणातील निकालाचाही उल्लेख यावेळी अजित पवारांनी केला. त्यापाठोपाठ जयंत पाटलांनी त्यावर मिश्किल भाष्य करत टोलेबाजी केली.
राहुल नार्वेकर यांची आज अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधी बाजूंच्या प्रमुख सदस्यांनी भाषणं केली. अजित पवारांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावेळी राहुल नार्वेकरांनी तटस्थपणे निकाल दिल्याचं नमूद करत त्यांचे आभार मानले. मात्र, यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा पिकला.
काय म्हणाले जयंत पाटील?
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर बंडखोर आमदारांना अपात्र करायचं की नाही? हे ठरवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सविस्तर सुनावणी देऊन निकाल बंडखोर गटाच्या बाजूने दिला होता. या प्रदीर्घ सुनावणीचा उल्लेख यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केला.
“कोर्ट म्हणून अध्यक्षांना जास्त काळ काम करायला लागलं. आम्ही सगळे त्यांच्यासमोर जाऊन आमची बाजू मांडत होतो. विधिमंडळाच्या चौथ्या मजल्यावर बसून त्यांनी न्यायदानाचं काम करतानाही आम्हाला उत्तम सहकार्य केलं. कधीही त्यांच्या वागणुकीत दुजाभाव आम्हाला दिसला नाही. उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो, त्यात दुरुस्त्या करण्यासाठीही ते मदत करायचे. त्यांनी संयमी असं काम केलं”, असं जयंत पाटील म्हणाले.
“न्यायालय अजून विचार करतंय”
दरम्यान, राहुल नार्वेकरांनी तेव्हा दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. “त्यांनी निकाल असा दिला, की अजून सर्वोच्च न्यायालयाला त्यावर निर्णय देता आलेला नाही. नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय. सर्वोच्च न्यायालयाचे एक सरन्यायाधीश घरी गेले (धनंजय चंद्रचूड यांची निवृत्ती). त्यांनी त्या निर्णयाला हात लावला नाही. त्यावर भाष्यही केलं नाही”, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
J
“अध्यक्षांनी कुणाला अपात्र केलं नाही. आमदार अपात्र ठरले असते तर त्या सगळ्यांना वेगळी लढाई लढत बसावं लागलं असतं. त्यामुळे उशीरा का होईना, मी तुमचे आभार मानेन. आता सर्वोच्च न्यायालयाने निकालच दिला नाही. त्यामुळे अध्यक्षांचाच निर्णय मान्य करून आता नवा डाव सुरू झाला आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.
देवेंद्र फडणीसांमध्ये झालेला बदल!
दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांमध्ये आपल्याला एक महत्त्वपूर्ण बदल दिसत असल्याचं नमूद केलं. “सत्ताधारी चांगलं सरकार चालवतील अशी अपेक्षा आहे. मी पुन्हा येईन असं फडणवीस म्हणाले होते. पण ते पाच वर्षं आले नाहीत. आले, पण दुसरीकडे बसले. पाच वर्षांत त्यांच्यात काय बदल झाले हे मी त्यांच्या भाषणात ऐकलं. त्यांनी एक अमूलाग्र बदल केला. विरोधी पक्षाशी संवाद साधण्याच्या प्रयत्नाचा त्यांनी उल्लेख केला. मी त्याचं स्वागत करतो”, अशी कोपरखळी त्यांनी मारली.