राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. सर्वात आधी बंडखोर आमदारांच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं हे राजकारण आता राज्यातील विविध प्रशासकीय, आर्थिक आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांपर्यंत आलं आहे. नुकताच फॉक्सकॉनपाठोपाठ एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात तापू लागला आहे. यावरून ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे सरकारला जबाबदार ठरवलं जात असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.
“सरकारनं गुजरातची चाकरी करायचं ठरवलंय”
गुजरातची सेवा करण्यासाठीच महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली.”महाराष्ट्रात सुशिक्षित तरुणांची मोठी निराशा झाली आहे. फॉक्सकॉन महाराष्ट्रात आला असता तर किमान ३ ते ४ लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. टाटांचा विमान बनवण्याचा प्रकल्पही गुजरातला गेला. याचा अर्थ जाहीर आहे की या सरकारने महाराष्ट्रापेक्षा गुजरातची चाकरी करायचं ठरवलं आहे. महाराष्ट्राऐवजी गुजरातची सेवा करायला सरकार निर्माण करण्याचं कट-कारस्थान महाराष्ट्रात झालं”, असं पाटील म्हणाले.
“यांचं गुजरातपुढे काहीही चालत नाहीये”
“महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प गुजरातला पळवून नेण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याकडे ढिम्मपणे बघत बसले आहेत”, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले. “या सरकारचा कॉन्फिडन्स कमी झालाय. त्यामुळे यांचं काहीही गुजरातपुढे चालत नाहीये. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हतबल झाले आहेत. आता पानभर जाहिराती ७५ हजार नोकऱ्या देणार हे सांगायला देतात. त्याऐवजी फॉक्सकॉनच्या मालकाला भेटलात आणि त्याला इथे आणलं तर एका दिवशी साडेचार लाख नोकऱ्यांचा निर्णय होईल. पण महाराष्ट्र सरकारने महाविकास आघाडीचे निर्णयच जाहीर करण्याचा प्रकार सुरू केला आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.
“पोलीस भरती निर्णयाची फक्त अंमलबजावणी करायची होती”
“महाराष्ट्रातील युवकांच्या मनातली निराशा काढायला महाविकास आघाडीने काही निर्णय घेतले होते. अनेक भरत्यांचे निर्णय घेऊन एमपीएससीला प्रस्ताव पाठवले होते. आता त्या प्रस्तावांमध्येही हे सरकार अडथळे निर्माण करतंय. पोलीस भरतीचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. त्याची फक्त अंमलबजावणी करायची होती. त्यातही हे सरकार अडथळे निर्माण करत आहे”, असा आरोप पाटील यांनी केला आहे.
प्रताप सरनाईकांना ईडीचा झटका, तात्पुरती ताब्यात घेतलेली ११.२ कोटींची मालमत्ता जप्त होणार!
“सरनाईकांच्या चौकशीचं कारणच नाही”
दरम्यान, शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांची ११.४ कोटींची मालमत्ता जप्त करण्याचा ईडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर त्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आता सरनाईकांची चौकशी करण्याचं काही कारणच शिल्लक राहिलं नसल्याचा खोचक टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. “प्रताप सरनाईकांची चौकशी ईडीनं करण्याचं कारण आता काही शिल्लक राहिलं नाही. तरी असं का? कदाचित प्रताप सरनाईक खासगीत काहीतरी बोलले असतील.म्हणून कदाचित असेल. काही सांगता येत नाही”, असं पाटील म्हणाले.