Jayant Patil : आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. खरं तर विधासभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे.

अशातच निवडणुकीच्या तोंडावर काही नेते पक्ष बदण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक एक मोठं विधान केलं आहे. “एका मोठ्या नेत्याने आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे”, असं जयंत पाटील यांनी नाशिकमधील येवला मतदारसंघातील मेळाव्यात बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, जयंत पाटील यांच्याकडे इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : Tekchand Sawarkar : “लाडक्या बहिणी कमळाला मत देतील म्हणून हा जुगाड”, वक्तव्यानंतर भाजपा आमदाराची सारवासारव; म्हणाले, “माझा असा…”

जयंत पाटील काय म्हणाले?

“विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व आमदारांचा पराभव करण्याचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. येवला विधानसभा मतदारसंघात पाच ते सहा जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता इच्छा व्यक्त करणाऱ्यांनी एकत्र बसा आणि एकमेकांना वचन द्या की एकाला उमेदवारी मिळाली तर दुसरे पाठिंबा देतील. नाहीतर मला तिकीट नाही मिळालं की मी चाललो तिकडे (दुसऱ्या पक्षात). असे असेल तर आधीच सांगा. त्यामुळे सर्व मिळून एकसंघ राहा. शरद पवार देतील तो आपला उमेदवार हे समजून काम करा”, अशा सूचना जयंत पाटील यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या.

“तुतारी वाजवणाऱ्या माणसाला महाराष्ट्रात अचानक प्रचंड मागणी आली आहे. शरद पवार यांच्याकडे तुम्ही दोन तास जाऊन जरी बसले तर तुमच्या लक्षात येईल. आता परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त करत होता. मग मी त्यांना म्हटलं का काय झालं? तिकडे तर बरोबर चाललंय तुमचं. ते मला म्हणाले मतदारसंघात जरा फिरलं तर सर्वजण म्हणतात की तुतारी घ्या, तुतारी. नाहीतर आपलं काही खरं नाही. त्यामुळे आता तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात आपण वियजी होणार नाही असं अनेक मतदारसंघातील नेत्यांना वाटायला लागलेलं आहे. हीच शरद पवारांची ताकद आहे आणि हीच ताकद आपल्या सर्वांना येवला मतदारसंघात दाखवण्याचं काम करायचं आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.