राज्य सरकारच्या विरोधी बाकावर असलेले अजित पवार आता सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी आज (२ जुलै) राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक आमदारही उपस्थित होते. तसंच, अजित पवारांसह आठ मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.
हेही वाचा >> राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती, प्रतोदपदाचीही जबाबदारी दिली, कोणाचा व्हिप लागू होणार?
जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार काम करत होते. आज सकाळी त्यांनी विधानसभेच्या सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर राजभवनात जाऊन शपथ घेतल्याचं निदर्शनास आलं. आम्ही जे पाहिलं तेच महाराष्ट्राने पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने शरद पवारांसोबत राहणार आहे हे स्पष्ट करण्याकरता येथे पत्रकार परिषद घेतली आहे.”
राष्ट्रवादीकडून निषेध
“काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतःहून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने गटनेता या नात्याने ठामपणाने सांगतो विधिमंडळ काँग्रेस पक्ष, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते झालेल्या घटनेचा निषेध करतंय. महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकसंघपणाने शरद पवारांसोबत राहिले, असंही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा >> “एक सिद्ध झालं…”, आदित्य ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया; म्हणाले, “एक वर्ष उलटल्यावरही…”
“टीव्हीवर दिसत असलेल्या बऱ्याच नेत्यांनी शरद पवारांना भेटून यासंदर्भात आम्ही गोंधळेललो होतो अशी भूमिका स्पष्ट केली आहे. सर्व आमदारांचं कन्फ्युजन आहे. पत्रकार परिषदेमुळे आता स्पष्ट झालं आहे. आजच्या घेण्यात आलेल्या कृतीला शरद किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांसाठी बुधवारी (५ जुलै) मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. यापुढची रणनीती या बैठकीत ठरवण्यात येण्याची शक्यता आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“जे घडलं, त्याची मला चिंता नाहीये. उद्या सकाळीच मी बाहेर पडणार आहे. कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजाच्या घटकांचा पहिला मेळावा घेणार आहे. त्यानंतर राज्यात आणि देशात जेवढं जाता येईल आणि जेवढा लोकांशी संपर्क वाढवता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी करेन”, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.