राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. या आमदारांविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ईमेल आणि व्हॉट्सअॅप मेसेजच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे, याबाबतची माहिती स्वत: जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
यावेळी जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नऊ सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या आणि पक्षाच्या हिताच्या विरोधात राजभवनात जाऊन शपथ घेतली आहे. त्यांची ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पूर्णपणे अंधारात ठेवून ही कृती करण्यात आली आहे. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे स्टेट डेसिप्लिन कमिटीच्या सल्ल्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली आहे.”
हेही वाचा- अजित पवार निधी देत नव्हते मग युतीत कसे आले? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले, “आता मी…”
“विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका पाठवली”
“विधानसभा अध्यक्षांच्या ईमेलवर ही याचिका पाठवली आहे. या कागदपत्रांची एक प्रत विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. काही तासात ही प्रत विधानसभा अध्यक्षांना मिळेल. मी स्वत: चारवेळा विधानसभा अध्यक्षांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हॉट्सअॅपवरही ही अपात्रतेची याचिका पाठवली आहे. त्याचबरोबर त्यांच्या ‘आय मेसेज’वरही व्हॉट्सअॅपवरील मेसेज लवकरात लवकर पाहावा, अशी विनंती केली आहे. उद्या अपात्रतेच्या याचिकेवर लवकरात लवकर आमची बाजू ऐकून घ्यावी, यासाठी आम्ही राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. ते लवकरात लवकर सुनावणी घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे,” असं जयंत पाटलांनी नमूद केलं.
“भारतीय निवडणूक आयोगालाही कल्पना दिली”
“त्याचबरोबर, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारतीय निवडणूक आयोगालाही याची कल्पना दिली आहे. नऊ आमदार म्हणजे पार्टी होऊ शकत नाही. ज्या नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे, ती राष्ट्रीय अध्यक्षांना न सांगता केलेली कृती आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तातडीने कायदेशीर पावलं उचलेल, असं मी दुपारी सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी सर्व पावलं उचलली आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आम्हाला लवकरात लवकर बोलवावं” असंही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा- एक वर्षापूर्वीच जयंत पाटलांनी अजित पवार यांना दिली होती ‘ही’ ऑफर, म्हणाले होते “तुम्हीच…”
“ज्यावेळी नऊ आमदारांनी पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आणि प्रदेशाध्यक्षांना कल्पना न देता शपथ घेतली. त्या क्षणापासून ते अपात्र ठरले आहेत. त्याबाबत आम्ही तातडीने पावलं उचलली आहेत. त्यांनी पक्षाच्या धोरण्याच्या विरोधात कृती केली आहे,” अशी माहिती जयंत पाटलांनी दिली.