गेल्या काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे चर्चेत आले आहेत. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलं आहे. “शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच,” असा निर्धार अजित पवारांनी व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. “अमोल कोल्हेंचा पराभव करणं सोप्प नाही,” असं जयंत पाटलांनी ठणकावून सांगितलं आहे. ते ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’च्या सभेत बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “अमोल कोल्हेंनी काय केलं? लोकसभेत किती काम केलं? देशातील प्रश्न किती मांडले? बैलगाडा शर्यतीसाठी दिल्लीत भाषणं करून न्याय कसा मिळवला, हा सगळा इतिहास जनतेसमोर आहे. काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतात. पण, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घरोघरी पोहचवणाऱ्या अमोल कोल्हेंचा पराभव करणं, एवढं सोप्प नाही.”
हेही वाचा :
“अनाजीपंताची खरी ओळख करून देण्याचं काम अमोल कोल्हेंनी केलं”
“अमोल कोल्हेंनी शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरावच. मात्र, मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन जायचं आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांबादद्ल अत्यंत आदर आणि संभाजी महाराजांबद्दल आपुलकी आहे. ही दोन व्यक्तीमत्व घराघरात पोहचवून अनाजीपंताची खरी ओळख करून देण्याचं काम अमोल कोल्हेंनी केलं आहे,” असंही जयंत पाटलांनी सांगितलं.
हेही वाचा : अजित पवारांच्या आव्हानाचं दडपण आहे का? अमोल कोल्हे म्हणाले…
अजित पवार काय म्हणाले?
“एका खासदारानं मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिलं असतं, तर खूप चांगलं झालं असतं. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचं काम मी केलं. तसेच, निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचं रान केलं आहे. मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ‘मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय,’ असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी हे बोलणार नव्हतो. पण, निवडणुका आल्यानं यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सूचत आहे,” असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केली होती.
हेही वाचा : अमोल कोल्हेंनी ‘या’ कारणामुळे मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले, “अनेक वर्षांपासून…”
“जनाधार पाहून उमेदवारी देतो”
“२०१९ साली शिरूरमध्ये योग्य पद्धतीनं उमेदवारी दिली होती. आम्ही जनाधार पाहून उमेदवारी देतो. निवडून आल्यानंतर कसं काम करायचं, हा ज्याचा त्याचा अधिकार असतो. मात्र, आता शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच,” असा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं.