डेंग्यूमुळे दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नसल्याचं समाजमाध्यमांद्वारे जाहीर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ( १० नोव्हेंबर ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. यानंतर लवकर अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचं बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अमित शाहांना भेटतात, ही चांगली गोष्ट आहे. मला खात्रीय की राज्याच्या हिताचेच प्रश्न अमित शाहांच्यासमोर ते मांडत असतील. राज्यातील ज्वलंत प्रश्न लवकर निकाली काढण्यावर चर्चा केली असेल, तर त्याचं स्वागत करतो.”
हेही वाचा : “शरद पवारांच्या दाखल्यावर ‘मराठा’ म्हणून उल्लेख, नामदेव जाधव…”, जयंत पाटलांनी सुनावलं
“कारण, मंत्रीमंडळातील काही लोक एक बाजू, तर काहीजण दुसरी बाजू मांडतात. आरक्षणप्रश्नी कुठल्याही मंत्र्यांमध्ये एकमत नाही. मंत्रीच जाहीरपणाने टोकाची भूमिका मांडत असतात. मुख्यमंत्र्यांचं सरकारवर नियंत्रण आहे की नाही? कुणावरही लगाम नसल्यानं सरकार दिशाहीन झालं आहे,” अशी टीका जयंत पाटलांनी केली.
“सरकार एका दिशेने जाताना लोकांना दिसत नाही. निधी वाटप, आरक्षण आणि विकासकामांवरून सरकारमध्ये मतभेद आहेत. काळजी करण्यासारख्या या गोष्टी आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न मागे राहिले आहेत,” असंही जयंत पाटलांनी म्हटलं.